येलूर : ज्येष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय ६९) यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता येलूर (ता. वाळवा) या जन्मगावी हजारोंच्या शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.नानासाहेब महाडिक यांचे शनिवारी दुपारी पेठनाका (ता. वाळवा) येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक परदेश दौऱ्यावर असल्याने, ते परतल्यानंतर रविवारी अंत्यविधी करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.नानासाहेब महाडिक यांचे निधन झाल्याची बातमी त्यांच्या मूळ गावी येलूर येथे समजताच शनिवारपासूनच संपूर्ण गाव शोकमग्न होते. आठवडा बाजारासह गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. रविवारीही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. रविवारी दुपारी साडेचार वाजता त्यांचे पार्थिव येलूरला आणण्यात आले. फुलाने सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल महाडिक, सम्राट महाडिक पार्थिवासोबत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्रातून नानासाहेबांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.गावातील त्यांच्या घरासमोर पार्थिव काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर घरासमोरील शेतात अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार उल्हास पाटील, विशाल पाटील, धैर्यशील माने, सत्यजित देशमुख, आनंदराव पवार, सी. बी. पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, वैभव नायकवडी, अभिजित पाटील, भीमराव माने, दि. बा. पाटील, चिमण डांगे, पी. आर. पाटील, जितेंद्र पाटील, गौरव नायकवडी, रणधीर नाईक, विक्रम पाटील, विनायक पाटील, बी. जी. पाटील, वैभव शिंदे, दादासाहेब पाटील, अमित ओसवाल, बी. के. पाटील, सर्जेराव यादव, स्वरूप पाटील, आप्पासाहेब बंडगर यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी पार्थिवास भडाग्नि दिला. यावेळी महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, बबन महाडिक, स्वरूप महाडिक, विनोद महाडिक, विश्वास महाडिक, सनी महाडिक, बिजू महाडिक, राजन महाडिक, सत्यजित पाटील, देवेंद्र पाटील, कीर्तीकुमार पाटील उपस्थित होते. यावेळी सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.रक्षाविसर्जन विधी सोमवार, दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता येलूर येथे होणार आहे.पेठ येथे अंत्यदर्शनासाठी गर्दीपेठ : पेठ (ता. वाळवा) येथे नानासाहेब महाडिक यांचे पार्थिव दुपारी ३.३0 ते ५ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पेठसह परिसरातील ग्रामस्थ व त्यांच्या समर्थकांनी नानासाहेब महाडिक यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, खासदार राजू शेट्टी, शैलजा पाटील, यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी आत्मशक्ती समूहाचे संस्थापक हणमंतराव पाटील, विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक अतुल पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, नेर्ले (ता. वाळवा) येथे दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवून नानासाहेब महाडिक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
नानासाहेब महाडिक यांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:36 AM