वारणावती : वारणावती (ता. शिराळा) येथील शासकीय विश्रामधामची दुरवस्था झाली आहे. त्याला अखेरची घरघर लागली आहे. गेल्या ४० वर्षांपासून चांदोलीच्या वैभवात भर टाकणारे हे विश्रामधाम होते. शासनाची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेरची घटका मोजत आहे.
चांदोली धरणाच्या निर्मितीवेळी अधिकाऱ्यांना धरणाची पाहणी व तपासणी करण्यासाठी चाळीस वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली. चांदोली धरणाचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी राजकीय नेतेमंडळी, शासकीय अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त विश्रामगृह वारणावती काॅलनीमध्ये बांधण्यात आले. देखभाल-दुरुस्तीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परिसरातील बागेसाठी माळीही कार्यरत ठेवण्यात आले. जेवण बनविण्यासाठी खानसाम्याची नियुक्ती झाली. विश्रामधामने उत्तम सोयी-सुविधा पुरवल्या. येथील बाग-बगीचा सौंदर्यात भर टाकत होता.
गेल्या आठ-दहा वर्षांत मात्र याचे वैभव संपुष्टात आले. शासनाने दुरूस्ती करण्याचे टाळले. विश्रामधामसाठी नेमण्यात आलेले खानसामा, माळी यांच्यासह इतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे विश्रामधाम सध्या कर्मचाऱ्यांनाविना ओस पडले आहे. अधिकारी तर केवळ राष्ट्रीय कार्यक्रम असेल तरच कार्यालयाकडे फिरतात. त्यामुळे या विश्रामधामकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या ते बंद आहे.अनेक भिंतींना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या टाक्या गळक्या आहेत. आठ ते दहा दिवस पाणी येत नसल्यामुळे पाण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. परिसरातील विजेचे खांबही गंजले आहेत. विश्रामधामच्या फलकाची दुरवस्था आहे. बाग नामशेष झाली आहे. सध्या केवळ एक चौकीदार कार्यरत आहे. शासकीय दौऱ्यानिमित्त कोणी मंत्री येणार असतील तर त्यादिवशी थोडी फार स्वच्छता केली जाते.
सध्या चांदोलीच्या पर्यटकांमध्ये वाढ होऊ लागली आहे. येथील पर्यटन विकासात विश्रामधामचीही डागडुजी होणे गरजेचे आहे.
फोटो
: वारणावती (ता. शिराळा) येथील विश्रामधामची दुरवस्था झाली असून कर्मचाऱ्यांअभावी गेले वर्षभर बंद आहे.