सचिन लाड - सांगली - स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने गुन्हेगारीला आळा घालण्यात व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यात बाजी मारली आहे. गेल्या तीन महिन्यात या विभागाने जिल्ह्यातील ४० गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये खून, दरोडा, घरफोडी, वाटमारी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी ४० जणांना अटक करुन ६३ लाखांचा माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक झाल्याने या विभागास बदनामीचा डाग लागला होता. सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण घडले होते. कदम निलंबितही झाले. या जागेवर जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक निवास साळोखे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांनीही केवळ महिनाभर काम पाहिले. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी नांदेडहून नव्याने आलेले निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याकडे गुन्हे अन्वेषणची सूत्रे सोपविली. घनवट जिल्ह्यात प्रथमच आले होते. त्यांना गुन्हे अन्वेषणचा गाडा चालविण्याचे मोठे आव्हान होते. मात्र त्यांनी हे आव्हान जुन्या व अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जोरावर लिलया पेलल्याचे दिसून येते. घनवट यांनी ४ जुलै २०१४ रोजी सूत्रे स्वीकारली. महिनाभर त्यांनी प्रलंबित व घडत असलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला. इस्लामपुरात एका महिलेचा खून झाला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा छडा त्यांनी अवघ्या चार दिवसात लावला. जतमधील सशस्त्र दरोड्याचा गुन्हाही उघडकीस आणला. जिल्ह्यात झालेल्या पाच मोठ्या घरफोड्या उघडकीस आणल्या. दुचाकी चोरट्यांना पकडण्याची सातत्याने कामगिरी होते. मात्र गेल्या काही दिवसात मोठी वाहने चोरणारी टोळीही सक्रिय झाल्याचे समजताच घनवट यांनी या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच ट्रक व दोन मोटारी जप्त केल्या. वाळवा तालुक्यातील एकास रिव्हॉल्व्हरसह जेरबंद केले. बोगस सीम कार्डचे दहा गुन्हे दाखल करुन दहा जणांना अटक केली. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांनी बोगस सीम कार्डचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून फरारी असलेल्या दहा गुन्हेगारांना अटक केली. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश केला. दुचाकी चोरांना केले ‘टार्गेट’पुण्यात बॉम्बस्फोट करण्यासाठी दुचाकीचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले होते. ही दुचाकी कऱ्हाडमधील एका पोलिसाची चोरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे एटीएस पथकाने राज्यातील पोलिसांना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घनवट यांच्या पथकाने चोरीतील २९ दुचाकी जप्त करुन चौघांना अटक केली. या दुचाकी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातून चोरल्याचे उघडकीस आले होते. गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने हे ४० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांचेही सातत्याने मार्गदर्शन मिळाले. - विश्वनाथ घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली.
तीन महिन्यात जिल्ह्यातील ४० गुन्ह्यांचा छडा!----लोकमत विशेष
By admin | Published: October 06, 2014 10:17 PM