सांगली : येथील मुख्य बस स्थानकावर सांगलीहून इचलकरंजीला जाण्यासाठी अमिना बाबालाल मुल्ला (वय ३७, रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) ही महिला बसमध्ये चढत असताना, त्यांचे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.
अमिना मुल्ला यांचे इचलकरंजी (जि. कोल्हापूर) हे माहेर आहे. शनिवारी त्या माहेरी जाण्यासाठी मायणीहून एसटीने सांगलीत आल्या. सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर त्या इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढल्या.
बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी तिकीट काढण्यासाठी पर्समधून पैसे घेतले, त्यावेळी पर्समध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने नव्हते. त्यांनी पिशवीची तपासणी केली, पण दागिने सापडले नाहीत. त्या मायणीहून सांगलीला येईपर्यंत पर्समध्ये दागिने होते, परंतु सांगलीत बस बदलताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समधील दागिने हातोहात लंपास केले. त्याची किंमत ४५ हजार रुपये आहे. मुल्ला यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आठवड्यापासून बस स्थानकावर सातत्याने घटनागेल्या आठवड्यापासून मुख्य बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रवासी महिलांना टार्गेट करुन चोरटे त्यांच्या पर्समधील दागिने हातोहात लंपास करीत आहेत. सातत्याने या घटना घडूनही त्याला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. तसेच चोरट्यांना पकडताही आलेले नाही. यामुळे प्रवाशांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण आहे.