सांगली : लातूर जिल्ह्याला पिण्यासाठी तेरणासह तीन धरणांतून २५ लाख लिटर पाणी उचलले आहे. मात्र प्रत्यक्षात हे पाणी पिण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाही. बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांनी कारखान्यांसाठी ते अधिकाऱ्यांच्या मदतीने पळवले आहे, असा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. लातूरमध्ये पाणीच नसेल, तर तेथे सध्या १६ बाटलीबंद पाण्याचे कारखाने कसे सुरू आहेत? ते कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत? या प्रकरणाचा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शोध घेऊन कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी लातूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई असल्याचे कळल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. लातूरमध्ये बाटलीबंद पाण्याचे १६ कारखाने आहेत. तेथे पाणी नाही म्हणून तेथील एकही कारखाना बंद नाही. हे कारखाने कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत, याचा शोध शासनाने घेऊन तेथील पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. लातूर जिल्ह्याला निम्न तेरणा, मांजरा या धरणांतून आणि घोणसी, डोंगरकोनाळी या छोट्या प्रकल्पातून पाणी उपलब्ध होत आहे. या धरणांतील २५ लाख लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून उचलले आहे. मात्र ते पाणी नागरिकांपर्यंत पिण्यासाठी पोहोचले नाही. हे पाणी कोठे गेले, याचा खडसेंनी शोध घेण्याची गरज आहे. आमच्या माहितीनुसार हे पाणी लातूर जिल्ह्यातील बाटलीबंद पाण्याच्या कारखानदारांनीच पळवले आहे. उपलब्ध पाण्याचे प्रशासन आणि सरकारने नियोजन न केल्यामुळेच तेथे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणाची शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, असे मत पाटणकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
लातूरमध्ये २५ लाख लिटर पाण्याची कंपन्यांकडून चोरी
By admin | Published: April 10, 2016 12:22 AM