सांगली : ‘एम पी’ (सुलेमान पथ्थर) नावाचा मौल्यवान खडा तपासणी करून देण्याच्या आमिषाने शहरातील एकास सव्वापाच लाखाचा गंडा घालण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पैशाची मागणी केल्यावर, जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी संदीप महादेव बोरगावे (वय ३२, रा. कुपवाड रोड, शारदानगर) यांनी पाचजणांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
यात दीपक पाटील, दिलावर मन्सुर पटेल (दोघेही रा. नांदणी ता. शिरोळ), अरुण साखरे (रा. इचलकरंजी), तात्यासाहेब आप्पासाहेब आडके (रा. जयसिंगपूर) यांच्यासह अन्य एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १६ मार्च २०२० रोजी संशयितांनी व्यावसायिक असलेल्या बोरगावे यांच्याशी संपर्क साधून, सुलेमान पथ्थर हा मौल्यवान खडा परदेशातून तपासणी करून घ्यायचा असल्याचे त्यांना सांगितले. हा खडा तपासणी करून घेण्यासाठी साडेसहा लाख रुपये लागणार असल्याचेही त्यांना सांगितले. संशयितांनी बोरगावे यांना विश्वास दिल्याने त्यांनी विश्रामबाग येथील एका हॉटेलमध्ये खडा तपासणीसाठी ५ लाख २५ हजार रुपये दिले.
त्यानंतर काही कालावधीने बाेरगावे यांनी दिलेल्या पैशाची मागणी केली असता, संशयितांनी त्यास टाळाटाळ सुरू केली. १२ जुलै २०२० रोजी शहरातील कल्पद्रुम मैदानाजवळ संशयितांनी बोरगावे यांना बोलावून घेतले व ‘पैशाची मागणी करू नको, पैसे विसरून जा’, असे म्हणत, ‘पैसे मागितल्यास तुला सोडणार नाही’, अशी धमकी दिली. यावेळी टोकदार हत्यार त्यांच्या पाठीला लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे बोरगावे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
चौकट
वारंवार पाठपुरावा करूनही पैसे नाहीत
वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्याने अखेर बोरगावे यांनी पाच संशयितांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.