सांगली : येथील रतनशीनगरमधील प्रसाद जालिंदर गायकवाड यांच्या घरात रविवारी दिवाळीला लक्ष्मीपूजनानिमित्त पूजलेल्या सहा लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी हातोहात डल्ला मारला. यामध्ये पाच लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने व दहा हजारांची रोकडचा समावेश आहे. याबाबत गुरुवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रसाद गायकवाड यांचे दुमजली घर आहे. दिवाळीला त्यांनी लक्ष्मीपूजनला तीन लाखाचे सोन्याचे गंठण, ३० हजाराच्या सोन्याच्या दोन बांगड्या, २५ हजाराचे दोन नेकलेस, ४० हजाराचा नेसलेस, ४५ हजाराचे दोन पेंडण, १८ हजाराची सोनसाखळी, ७५ हजाराचे ब्रेसलेट, ३० हजाराचे दोन कानातील टॉप्स् जोड, दोन हजाराचे घड्याळ व दहा हजाराची रोकड असा एकूण सहा लाखांच्या ऐवजाचे पूजन केले होते. त्यांचे कुटुंब दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. सोमवारी सकाळी सहा वाजता गायकवाड यांच्या घराची बेल वाजली. गायकवाड यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी दूधवाला आला होता. गायकवाड यांनी दूध घेतले. त्यानंतर ते दरवाजा उघडा ठेवून आमराईत फिरायला गेले. ते परत नऊ वाजता आले, पण लक्ष्मीपूजनावेळी पूजलेला एकही ऐवज नव्हता. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी घरात चौकशी केली. पण घरातील लोकांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी) चौकट... चोरट्यांचा धुमाकूळ गेल्या महिन्याभरापासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरात घुसून लॅपटॉप, मोबाईल लंपास केले जात आहेत. बंद बंगले फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला जात आहे. घरासमोर लावलेले ट्रक, रिक्षा व दुचाकी पळविल्या जात आहेत. बँकेतून बाहेर पडलेल्या ग्राहकांच्या ताब्यातील लाखोंची रोकड लंपास केली जात आहे. सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना, पोलिसांना एकाही चोरीचा छडा लावता आला नाही. तसेच चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.
लक्ष्मीपूजनाचा सहा लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: November 04, 2016 12:01 AM