आळसंद : आळसंद (ता. खानापूर) येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत आठ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. आगीत ३० गुंठे केळी बागेच्या काही भागासह ठिबक सिंचनच्या साहित्याचेही नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.आळसंद येथील कमळापूर रस्त्यालगत लव्हाण नावाच्या शेतात ताकारी, आरफळ योजनेच्या पाण्यावर ऊसपीक घेण्यात आले आहे. सर्व ऊस उत्पादकांचा सुमारे आठ एकर ऊस शेतात होता. दुपारी दीडच्या सुमारास अचानक उसाच्या फडाला आग लागली. यावेळी वारे व उन्हाचा तडाखा असल्याने आगीने क्षणार्धात उग्ररूप धारण केले. या आगीत तानाजी भीमराव जाधव यांचा ३० गुंठे, विजया संपत महाडिक, संपत बापूसाहेब महाडिक यांचा चार एकर, तर विलास बापूसाहेब महाडिक यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. यावेळी सुरेश भीमराव जाधव यांच्या ३० गुंठे केळीच्या बागेपैकी दोन ओळीतील केळीच्या १२० ते १५० रोपांना आगीची झळ पोहोचली.उसाच्या फडाला आग लागल्याची माहिती आळसंद गावात पसरताच शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्रांती साखर कारखाना व विटा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, उसाच्या फडात गाड्या जात नसल्याने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने वाट करीत अग्निशमन वाहनांना फडात प्रवेश करावा लागला. सुमारे दोन ते अडीच तासानंतर आग आटोक्यात आली. उसाच्या फडाला आग लागली, त्यावेळी भारनियमन असल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोका टळला. आग नक्की कशामुळे लागली, याचे कारण समजलेले नाही. (वार्ताहर)
आळसंदला आठ एकर ऊस आगीत जळून खाक
By admin | Published: January 07, 2015 11:11 PM