इस्लामपूर : माझे सहकारी, प्रमुख पदाधिकारी व राज्यातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण वर्षभरात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी चोख पार पाडू शकलो, अशी भावना माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी कृषी, अर्थ व रोजगार क्षेत्रात वाट लावणाऱ्या शेतकरीविरोधी सरकारला हाकलून लावण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.जयंत पाटील यांनी पुणे येथे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारुन एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, गेल्या वर्षभरात आपल्या पक्षाचा पूर्ण फोकस बूथ पातळीवर पक्षबांधणी करून केंद्र व राज्यातील सामान्य माणूस व शेतकरीविरोधी सरकारचा पर्दाफाश करण्यावर राहिलेला आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी सर्व विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांच्या बैठका घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थिती जाणून घेतली. आम्ही पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये समाजाच्या सर्व घटकांतील कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले. सध्या राज्यभरात बुथ पातळीवर राष्ट्रवादीचे चार लाखांपेक्षा अधिक सदस्य झालेले आहेत. बुथ पातळीवर सर्व अध्यक्षांशी मी वेळोवेळी ‘आॅडियो कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संपर्क साधत आहे.‘हल्लाबोल’, ‘निर्धार परिवर्तनाचा’ यासारख्या राज्यभरात झालेल्या आंदोलनातून जनतेच्या आक्रोशाला वाट मिळाली. पक्षाच्या सर्वस्तरातील कार्यकर्त्यांना एक चांगला ‘कृती कार्यक्रम’ मिळाला आहे.पाटील म्हणाले, पुढील सहा महिने आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. जनतेच्या विरोधात काम करून राज्याच्या कृषी, रोजगार आणि अर्थव्यवस्थेची वाट लावणारे राज्य सरकार जनतेच्या साथीने आपल्याला बदलायचे आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ‘रयतेचे राज्य’ आणायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील ‘नवा महाराष्ट्र’ घडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आपण ती पार पाडूया, असेही पाटील यावेळी म्हणाले.जयंत पाटील यांचा आज थेट संवादजयंत पाटील आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ते ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून हा संवाद साधणार आहेत. आपण आपल्या मनातील प्रश्न व सदिच्छांसह या संवाद पर्वात सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरीविरोधी सरकारला हाकलून लावा: जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:48 PM