सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून राजकीय नेत्यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरून मोक्कांतर्गत कारवाई करावी. त्याशिवाय राजकीय नेते शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर होणार नाहीत, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली; मात्र कर्जमाफीतून शेतकºयांची पिळवणूकच अधिक होत आहे. उसाच्या एफआरपीसह दुधाचा निर्माण झालेला प्रश्न सोडविण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे शेतकरी यापुढे आत्महत्या न करता, संयमाने अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहेत. त्यासाठीच सोमवारी (दि. १४ मे) संपूर्ण राज्यभरात जेल भरो आंदोलन करणार असल्याचे रघुनाथदादा यांनी सांगितले.
साहेबराव कर्पे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती, तर अलीकडे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्या केली होती. यादरम्यान ७५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. मात्र, आता आत्महत्या न करता राज्यघटनेच्या कलम २१ नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. म्हणून राज्यभर शेतकरी जेल भरो करणार आहोत. या आंदोलनातून शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.भाजप, काँंग्रेस हे उद्योजकांचेच !कॉँग्रेसचे सरकार असो अथवा भाजपचे, यांना शेतकºयांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करावयाचे आहे. उद्योजकांना कमी पगारात राबणारे कामगार मिळावेत, म्हणून शेतकरी व ग्रामीण भागातील कामांसाठी, सिंचन योजनांसाठी पैसे नसल्याचे सरकार सांगत आहे. शेती सोडून शहरात लोकांनी यावे व ते उद्योजकांना कामास उपयोगी यावेत, हेच सरकारचे धोरण आहे. काँग्रेसचे सरकार टाटा, बिर्लांसाठी, तर आताचे भाजप सरकार अंबानी, अदानी यांच्यासाठी काम करीत आहेत.