सांगली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची प्रचंड दुरवस्था झाली असून, एकाही नेत्याला या क्रीडांगणाबद्दल आस्था वाटत नाही, अशी टीका रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या ताब्यात असलेले हे क्रीडांगण आहे. १९९८ पासून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात असणारी ही महापालिका आहे. यात भाजपने काही वर्षे सत्ता भोगली. राज्यात सध्या महाआघाडी सरकार असतानासुद्धा स्टेडियमच्या विकासाबाबत कोणतेही प्रयत्न होत नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या विकासाकरिता १७.४५ कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास व सामाजिक न्याय विभागाकडे दिला होता. मंत्रालयात २०१८ पासून याबाबतची फाईल धूळ खात पडली आहे. यावर भाजप असो वा महाआघाडी सरकार यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. खर्चाचे ऑडिट, बेकायदा अतिक्रमण, पॅव्हेलियन दुरवस्था, क्रीडांगणाची समपातळी, मुरुमीकरण, मोजणी याबाबत कोणतीच कारवाई आयुक्तांनी व महापालिका प्रशासनाने केली नाही. स्टेडियमची दुरवस्था झाल्याने स्टेडियमचा वापर हा खेळासाठी कमी आणि चारचाकी शिकण्यासाठी, कृषी, औद्योगिक प्रदर्शने, राजकीय सभेसाठी होत असल्याने क्रीडाप्रेमी व नागरिक संतप्त आहेत.