सांगली : लोकशाहीचा महात्यौहार असलेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. राजकीय नेत्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण व शहरी मतदारांत उत्साह दिसून आला. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी त्यांच्या चिंचणी (ता. तासगाव) येथे, तर स्वाभिमान पक्षाचे विशाल पाटील यांनी पद्माळे (ता. मिरज) येथे सकाळी सात वाजता मतदान केले. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या साखराळे येथे पत्नी शैलजा, मुले राजवर्धन व प्रतीक यांच्यासह मतदान केले. आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी येथे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ व त्यांच्या पत्नी मंजिरी यांनी खणभागातील उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. आमदार सुरेश खाडे यांनीही पत्नीसह मतदान केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी चिंचणी (ता. कडेगाव) येथे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी कडेपूर येथे मतदान केले. आमदार विश्वजित कदम यांनी पत्नी स्वप्नाली, आई विजयमाला, चुलते जयसिंगराव यांच्यासह सोनसळ येथे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी कडेपूरला, तर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कोंगनोळी येथे मतदान केले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे सहकुटुंब मतदान केले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर येथे मतदान केले. चिखली (ता. शिराळा) येथे आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी, तर कोकरूड येथे काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला. महापौर संगीता खोत यांनी मिरजेत, आमदार विलासराव जगताप यांनी जतला, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगलीत मतदान केले.
मतदानातही नेत्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:44 PM