सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रत्येक गावा-गावात आहे. कोरोनाच्या महामारीत लाखो लोक बेरोजगार बनले. अनेकांचे व्यवसाय बुडाले. कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य माणूस कोरोनाबाधित झाल्यावर त्याला ऑक्सिजनच काय, बेड सुद्धा मिळत नाही. उपचाराअभावी त्याचा मृत्यू होत आहे. या संकटसमयी दानशूर वनश्री नानासाहेब महाडिक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. समाजकार्य कसे करायचे, संकटात लोकांना मदत कशी करायची हे त्यांनी दाखवून दिले असते.
सर्वसामान्यांच्या दुःखात त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नाना सदैव तत्पर असायचे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत नानासाहेबांनी कार्याचा दबदबा निर्माण केला होता. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण करण्यालाच महत्त्व दिले.
वाळवा तालुक्यातील पेठ येथे नानासाहेब सर्वसामान्य माणूस असो वा राजकारणी, त्यांना मदत करायचे. नानांकडे कोणीही मदत मागायला गेले आणि रिकाम्या हाताने परत आले, असे कधी घडले नाही. गोरगरिबांना त्यांच्या असण्याचा मोठा आधार होता. सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नाना नेहमी प्रयत्न करत होते. तालुक्यातीलच काय, जिल्ह्यातील भांडण-तंटे मिटविण्यासाठी अनेक नागरिक नानांकडे गेले की, जाग्यावरच त्याचा न्यायनिवाडा केला जात होता. समाजकार्य करत असताना प्रत्येक समाजात आपले जवळचे नाते निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी लागेल ती मदत करून ते युवकांना प्रोत्साहन देत होते.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करण्यासाठी नानांचा पुढाकर असे. मुस्लिम समाजासाठी रोजे व इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांसाठी वाळवा तालुक्यातील गावा-गावात अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्याचे काम त्यांनी केले. नानासाहेबांनी सर्व जाती-धर्मात एकोपा राखण्यासाठी काम केले. नानासाहेबांनी गावातील वयोवृद्ध, तरुण, महिला यांना गावाच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. तसेच शासनाच्या विकास कामांच्या निधीसह गरज पडेल तिथे स्वतःकडील आर्थिक मदत देऊन गावाचा विकास घडवून आणला.
नानासाहेबांनी गावातील सार्वजनिक विकासाला प्राधान्य दिले. १९९० मध्ये नानासाहेबांनी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी भैय्या महाडिक सहकारी पतसंस्था स्थापन केली. ही संस्था नावारूपाला आल्यामुळे पुढे या संस्थेचे नामकरण नागरिकांच्या आग्रहास्तव वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सहकारी सोसायटी असे करण्यात आले. या संस्थेचे वाळवा, शिराळा, मिरज, कडेगाव, पलूस आदी तालुक्यांबरोबरच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात जाळे निर्माण करून, लोकांना तात्काळ आर्थिक पुरवठा करणारी संस्था अशी नोंद नावारूपाला आली.
ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी कुंडलवाडी, मालेवाडी, गाताडवाडी या ठिकाणी शैक्षणिक विद्यालय सुरू केले. या ठिकाणी आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नानासाहेबांनी पेठ येथील भोंड्या माळरानावर पन्नास एकरामध्ये व्यंकटेश्वरा शिक्षण संकुल उभारले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या शिक्षण संस्थेतून अनेक नामवंत विद्यार्थी घडत आहेत. हे शैक्षणिक संकुल महाराष्ट्रामध्ये आदर्श शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आले आहे.
शैक्षणिक संकुलात के.जी.पासून पी.जी.पर्यंत, लहान मुलांसाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण, इंजिनिअरिंग कॉलेज, आयटीआय कॉलेज, डी.एड्., बी.एड्. कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज सुरू केले. या कॉलेजमध्ये आज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कॉलेजमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या जातात.
या संस्थेचे कामकाज संस्थेचे सचिव, युवा नेते राहुल महाडिक व युवा नेते सम्राट महाडिक हे पाहत आहेत. तसेच नानासाहेब यांच्या आशीर्वादाने राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी गोविंद मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकल्प कोट्यवधी रुपयांचा उभारला जात आहे.
सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील, विलासराव शिंदे, शिवाजीराव देशमुख, तसेच शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांना वेळोवेळी निवडणुकांसाठी सहकार्य करून त्यांना राजकीय ताकद देण्याचे काम नानासाहेबांनी केले.
नानासाहेब यांच्या नेतृत्वाखाली येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून श्रीमती मीनाताई नानासाहेब महाडिक यांनी दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. तसेच पेठ (ता. वाळवा) गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून श्रीमती मीनाक्षीताई नानासाहेब महाडिक यांनी गावाच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. युवा नेते राहुल महाडिक यांनी पाच वर्षे येलूर जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. राहुल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मतदार संघातील गावातील विकासाची घोडदौड चालू आहे. येलूर गावचे निर्मलग्राम सरपंच राजन महाडिक यांनी गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. गावाचे नाव राज्यात नावारूपाला आणले आहे.
तसेच पेठ जिल्हा परिषद मतदार संघातून नानासाहेबांनी युवा नेते सम्राट महाडिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. महाराष्ट्रात सर्वात लहान तरुण जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
आज पेठ जिल्हा परिषद मतदार संघातून बांधकाम सभापती म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन एक इतिहास घडवला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू सत्यजित विश्वासराव पाटील यांच्याशी नानासाहेब यांची कन्या रोहिणीताई यांचा विवाह नानासाहेबांनी शाही थाटात करून दिला होता. आज रोहिणीताई सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून सेवा करीत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी नानासाहेब यांनी प्रयत्न केले.
जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावात त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात आणून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, मार्केट कमिटी सभापती केले आहे. खासदार व आमदारकीच्या निवडणुकीत जिकडे वनश्री तिकडेच ‘विजयश्री’ असे समीकरणच बनले होते.
नानासाहेबांनी आपल्या दोन मुलांना म्हणजे राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांना सामान्य नागरिकांप्रती बांधिलकी जपण्याचा विचार दिला. नानासाहेबांचे स्वप्न होते राहुल व सम्राट महाडिक यांना शिराळा व वाळवा या विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्याचे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन राहुल महाडिक व सम्राट महाडिक जनसेवा करीत आहेत. महाडिक कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्यांनी साथ दिली, तर येत्या काळात राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांना आमदार करण्याचे नानांचे स्वप्न पूर्ण होईल आणि हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!
लेखक- विजय पाटील
शब्दांकन - संजय येंगटे