कवठेमहांकाळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील सह्याद्री देवराई संस्थेमार्फत निर्माण करण्यात येणारे ‘सह्याद्री-देवराई-अग्रणी’ जैवविविधता उद्यान राज्यात एक आदर्श व उल्लेखनीय पर्यावरण प्रकल्प ठरेल. असे प्रतिपादन सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जैवविविधता उद्यान अग्रण धुळगाव येथे सह्याद्री देवराई संस्थेमार्फत निर्माण केले जात आहे. याची सुरवात मंगळवारी अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते सागर कारंडे, सचिन चंदने, उपवनसंरक्षक विजय माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी सयाजी शिंदे बोलत होते.
यावेळी सयाजी शिंदे म्हणाले, २५ एकर क्षेत्रात विविध प्रजातींची १६ हजार झाडे लावली जातील. त्यासाठी सह्याद्री देवराई संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
आमच्या संस्थेने सातारा जिल्ह्यात अशी देवराई निर्माण केली आहे, तशीच आता अग्रण धुळगावमध्येही दिसेल.
सह्याद्री देवराईचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे अभिनेते चला हवा येऊद्या फेम सागर कारंडे, सह्याद्री-देवराईचे सचिन चंदने, उपवन संरक्षक विजय माने, वनस्पतीशास्त्रज्ञ सुहास वायंगणकर, शिल्पकार किशोर ठाकूर, तहसिलदार बी. जे. गोरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, अग्रणी फाउंडेशनचे शिवदास भोसले, सरपंच ग्रामसेवक सदस्य आदी सहभागी झाले.
अग्रण-धुळगावपासून अर्धा किलोमीटर अंतरावर उद्यान साकारत आहे. वृक्षारोपणासाठी वनविभागाने खड्डे काढले आहेत. विविध प्रजातींची झाडे सह्याद्री देवराईकडून दिली जातील, त्यातील २० प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावरील आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ठिबक व अन्य अनुषंगिक खर्चही देवराई करणार आहे. झाडे लावण्याच्या मोहिमेत स्थानिक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, विद्यार्थी व वृक्षप्रेमी सहभागी होत आहेत.
येत्या आठवड्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणाला प्रारंभ होणार आहे. झाडांच्या संगोपनासाठी अग्रणी पानी फाउंडेशन, सह्याद्री देवराई तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. सांगली जिल्ह्यात या प्रकारचे हे पहिलेच इतके मोठे जैवविविधता उद्यान असल्याचे फाउंडेशनचे शिवदास भोसले यांनी सांगितले.
चौकट
१५० प्रजातींची झाडे
अग्रण धुळगाव येथे २५ एकर क्षेत्र वनविभागाच्या मालकीचे आहे. त्यामध्ये विविध सहा उद्याने तयार केली जातील. आयुर्वेदिक वनस्पती, फळझाडे, लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी उद्याने, ऑक्सिजन देणारी १५० प्रजातींची झाडे लाऊन वैविध्य राखले जाणार आहे.