सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेने भाजपला बहुमताने सत्ता दिली, पण त्यांची सत्ता जनतेच्या उपयोगी नव्हती. त्यामुळेच काँग्रेस व भाजपमधील सुजाण नगरसेवकांमुळे आघाडीची सत्ता आली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केले. प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला.
महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, शेखर माने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मयूर पाटील उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, हारुण शिकलगार यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. मदनभाऊ पाटील यांनाही कायम साथ दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण सतत राजकीय विचार करणाऱ्यांमुळे बिनविरोध झाली नाही.
महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यापासून नवे उपक्रम राबविले जात आहेत. रस्ते, रुग्णालयांच्या सुधारणा होत आहेत. तौफिक याच्यारूपाने तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यरत आहेत. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही. या प्रभागाच्या विकासासाठी सर्व नेते, महापौर लक्ष देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जातीयवादी शक्ती रोखा
विश्वजित कदम म्हणाले की, हारूण शिकलगार यांनी २५ वर्षे वाॅर्डाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविल्या. त्यांच्या अकाली निधनानंतर तौफिकला काम करण्याची संधी द्या. ही निवडणूक जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. काहीजण निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बळी पडू नका, असे आवाहनही केले.