सचिन लाड--सांगली --येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) स्लॅबला गळती लागल्याने पावसाचे पाणी व्हरांड्यात साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यातच रुग्णांच्या नातेवाईकांना कागदी पुठ्ठे टाकून बसावे लागत आहे. रात्रभर जागरण करावे लागत आहे. प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. रुग्णांबरोबर त्यांनाही आजाराला तोंड द्यावे लागत आहे.गोरगरिबांचा आधार म्हणून शासकीय रुग्णालयाचा पश्चिम महाराष्ट्रात लौकिक आहे. कर्नाटकातील रुग्णही येथे उपचारासाठी येतात. रुग्णालयाची इमारत प्रचंड जुनी आहे. चारशे रुग्णांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी रुग्णांना ठेवण्यासाठी कॉट कमी पडू लागल्या आहेत. एका रुग्णाजवळ किमान दोन ते तीन नातेवाईक असतात. स्पेशल वॉर्ड नसल्याने एका वॉर्डात किमान २० ते २५ रुग्ण आहेत. या रुग्णांजवळ नातेवाईकांना राहण्याची सोय नाही. त्यांना वॉर्डाबाहेर व्हरांड्यात साहित्य घेऊन बसावे लागते. रुग्णाला जेवण व औषधे देण्यापुरतीच त्यांना आत जाण्याची परवानगी दिली जाते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रुग्णालयातील स्लॅबला गळती लागली आहे. पावसाचे पाणी व्हरांड्यात साचून राहिले आहे. साचलेल्या पाण्यात नातेवाईक कागदी पुठ्ठे टाकून बसत आहेत. अतिदक्षता विभागाजवळ तर तळेच साचले आहे. याठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी कपाटाची सोय करण्यात आली आहे. पण नातेवाईकांनी बसायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालय परिसरात पाण्याची डबकी साचून राहिली आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही गेटजवळही पाणी साचून राहिले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. नातेवाईकांना पाण्यातूनच आत-बाहेर करावे लागत असल्यामुळे रुग्णालयातील फरशा ओल्या होत आहेत. रुग्णांपेक्षा त्यांची काळजी घेण्यासाठी थांबलेल्या नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयातील व्हरांड्यात तसेच परिसरात पाणी साचून राहिल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. पोर्चमध्ये तर पाय पुसण्यासाठी कागदी पुठ्ठा टाकण्यात आला होता. हा पुठ्ठा चिखलाने माखला आहे. व्हरांड्यात साचलेले पाणी काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. प्रस्ताव धूळ खात‘सिव्हिल’ दुरुस्तीचे सर्व प्रकारचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होते. रुग्णालयाची इमारत जुनी झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागाने आठ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. पण या प्रस्तावावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. परिणामी रुग्णालयातील स्लॅबला गळती, खिडक्यांची मोडतोड, घाणीचे साम्राज्य, रुग्णांच्या नातेवाईकांना शौचालय नाही, पाण्याच्या पाईपला गळती या समस्या निर्माण झाल्या आहेत. याची दुरुस्ती करण्यासाठीच बांधकाम विभागाने आठ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. अतिदक्षता विभागासह अनेक वॉर्डाबाहेरील व्हरांड्यात स्लॅबमधून पावसाचे पाणी पडत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यातच नातेवाईकांना जेवण करावे लागत आहे. बसणे व झोपणे अवघड झाले आहे. वॉर्डात रुग्णाजवळ बसण्यास डॉक्टर परवानगी देत नाहीत. रुग्णांपेक्षा नातेवाईकांचे हाल होत आहेत.
सांगली सिव्हिल हॉस्पिटलला गळती; नातेवाईकांचे हाल
By admin | Published: July 12, 2016 11:45 PM