सांगली : महापालिकेच्या अनेक जागा कवडीमोल दराने भाड्याने देण्यात आल्या आहेत. पण या जागांचा व्यावसायिक वापर होतो. त्यामुळे खासगी मंडळांना महापालिकेच्या जागा भाडेपट्टीने देऊ नये, अशी मागणी करीत महासभेत तीन जागांचे ठराव घुसडण्यात आल्याचा आरोप नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केला.
तत्कालीन नगरपालिका व महापालिकेच्यावतीने अनेक मोकळ्या जागा क्रीडा, सामाजिक संघटनांना भाडेपट्टीवर देण्यात आल्या आहेत. काही जागांची मुदत संपली आहे. या संस्थांना कवडीमोल दराने भाडेपट्टी आकारली जात आहे. अनेक ठिकाणी या जागांचा गैरवापर होत आहे, तर काही जागांवर व्यावसायिक वापर सुरू आहे. मालमत्ता विभागाने चौकशी करून या जागा ताब्यात घ्याव्यात. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढेल.
दुसरीकडे १६ जुलैच्या महासभेत उपसूचनेद्वारे तीन जागा भाडेपट्टीने देण्यास मान्यता दिली आहे. मिरजेतील जागा एका युथ फौंडेशनला दिली होती. त्याची मुदत संपली आहे. आता २९ वर्षांसाठी भाडेपट्टी देण्यास मंजुरी दिली आहे, तर सांगलीतील एक मोकळी जागा व शाळेच्या खोल्या दोन मंडळांना देण्यासही मान्यता दिली आहे. या तीनही जागा कवडीमोल दराने भाडेपट्टीने देण्यात आल्या आहेत. महापालिका आर्थिक अडचणीत असताना महासभेत उपसूचनेद्वारे जागांचा बाजार सुरू आहे. या जागा कुणाच्या घश्यात घातल्या जात आहेत? आयुक्तांनी हा ठराव विखंडित करावा, अशी मागणीही साखळकर यांनी केली.