लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात परिणाम दिसून आला. संपाच्या भितीने हॉटेल मालकांनी दुधाचा साठा करून ठेवला होता. मात्र हा स्टॉकही संपल्याने ‘चहा सोडून बोला’ असे ऐकायला मिळत होते. संपापूर्वी हॉटेल मालकांनी दूध आणि इतर भाजीपाल्यांचा स्टॉक करून ठेवला होता. दोन दिवसांत संप मिटेल, अशी अशा बाळगून अनेकांनी मर्यादित साठा केला होता. दुसऱ्या दिवशीही संप सुरूच राहिल्याने हॉटेलमालक चिंतेत आहेत. दूध आणि भाजीपाला रोजच्या रोज आणावा लागतो. मात्र भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्याने नास्टाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. दुधाचे टँकर पोलिस बंदोबस्तात येत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी अनेक हॉटेलमध्ये दुधाच्या पिशव्या शुक्रवारी पोहोचल्या नाहीत. संप आणखी दोन दिवस सुरू राहिला तर हॉटेलला टाळे लागण्याची शक्यता आहे.शेतकरी संपामुळे मार्केटयार्ड परिसरातील चित्र शुक्रवारी वेगळेच दिसले. ऐरवी सकाळी सहा वाजता या परिसरात शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची. मात्र शुक्रवारी एकही शेतकरी भाजी घेऊन आला नसल्याचे जाणवले. मार्केटयार्डला शुक्रवारी सुटी असते. यामुळे संपाचा आणखीनच परिणाम जाणवला. मात्र जो माल खराब होण्याची शक्यता आहे. असा माल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काही दलालांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. मेथीची पेंडी दहा रुपयांना मिळत होती. ती आता काही ठिकाणी वीस रुपयांना विकली जात आहे. बहुतांश ठिकाणी मेथीची पेंडी संपल्याचे दिसून येत आहे. राजवाडा भाजी मंडईतही हीच स्थिती होती. काहींनी भाजी विक्री बंद करून फिरायला जाणे पसंत केले आहे. तुमचा संप.. आमची विश्रांती !सातारा मार्केटयार्डमध्ये नेहमी खांद्यावर बटाटे आणि कांद्यांची पोती घेऊन जाणारे हमाल शुक्रवारी वेगळ्याच विश्वात होते. शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे या हमालांना विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळाला. शुक्रवारी मार्केटयार्डला सुटी असली तरी हमालांकडून छोटी-मोठी कामे केली जातात. त्यामुळे काही हमाल सुटीच्या दिवशीही या ठिकाणी येत असतात. रोज कमाई झाली तरच एकवेळचे जेवण मिळणार, अशी परिस्थिती असलेल्या हमालांना हा संप लवकर मिठावा, असे वाटत आहे. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा विश्रांती केलेली बरी, असे म्हणून अनेकांनी शुक्रवारचा दिवस विश्रांतीमध्ये घालविला.रिक्षा चालकाची बारा वाजता झाली भवानी!पहाटे सहा वाजता रिक्षाचालक मार्केटयार्डमध्ये रोज येत असतात. सकाळी तरकारीचे भाडे त्यांना मिळत असते. मात्र शेतकऱ्यांच्या संपामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत रिक्षा चालकाला भाडे मिळाले नव्हते. त्यानंतर त्याला एक भाजीविक्रेते गिऱ्हाईक आले. हा संप असाच सुरू राहिला तर आम्हाला रिक्षा या ठिकाणी उभ्या करणे परवडणार नाही. असे रिक्षाचालक समीर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चहा सोडून बोला !
By admin | Published: June 02, 2017 11:20 PM