सांगली : जत तालुक्यातील ५२ गावांत झालेल्या एलईडी खरेदीत अनियमितता असल्याची तक्रार करीत जिल्हा परिषद सदस्यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. संबंधितांवर कारवाईची मागणी केली. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी याची गंभीर दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले.
जिल्हा परिषदेची तहकूब झालेली सर्वसाधारण सभा गुरुवारी वसंतदादा पाटील सभागृहात संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षस्थानी पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, प्रा. सुषमा नायकवडी, ब्रम्हानंद पडळकर, अरुण राजमाने, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.
सभेत सदस्या सुनीता पवार यांनी जतमधील एलईडी खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. जत तालुक्यातील ५२ गावांमध्ये झालेली ही खरेदी चुकीच्या पद्धतीने झाल्याबद्दल त्यांनी तक्रार केली. त्या म्हणाल्या की, तीन लाखांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करण्यासाठी ई-निविदा करणे बंधनकारक असताना, हजार लोकवस्तीच्या गावातही सुमारे ८ लाखांचा निधी कसा काय खर्च केला गेला? ही गोष्ट केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, जवळपास ५२ गावांमधील आहे. अनेक सदस्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करून चौकशीची मागणी अध्यक्षांकडे केली. जत तालुक्यातील गावांची तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष देशमुख यांनी दिले, तर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी या ग्रामपंचायतींमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई करण्यात येइल, असे स्पष्ट केले.