सांगली : शेतमालाच्या विक्रीविषयी काही तक्रारी असतील तर बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे. बेकायदेशीर मार्गांनी कोणीतरी आंदोलन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
बुधवारी (दि. १७) काहीजणांनी बेदाण्याचे सौदे बंद पाडले होते. त्या पार्श्वभूमीवर सभापती पाटील यांनी सांगितलेे की, सौदे बंद पाडण्याच्या प्रकाराविषयी काही व्यापाऱ्यांनी समितीकडे नाराजी व्यक्त करत संरक्षणाची मागणी केली आहे. पाटील यांनीही व्यापाऱ्यांना पारदर्शकतेचे आवाहन केले. शेतकऱ्यांचे हित पाहून व्यापाराची सूचना केली. सौदे व व्यापाराविषयी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर थेट समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. तक्रारीचे समाधानकारक निराकरण झाले नाही तर त्यांनी कायदेशीर मार्गांनी आंदोलन करायला हरकत नाही, पण काहीही सबळ कारण नसताना कोणीही यावे आणि बेकायदा आंदोलन करावे हे सहन केले जाणार नाही. कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पाटील म्हणाले. यावेळी सचिव एम. पी. चव्हाण उपस्थित होते.