सांगली : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारात मावा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर कडक कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या थुंकीबहाद्दरांवर कडक कारवाईचे आदेश अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सुरक्षा बलाच्या जवानांना दिले आहेत.शासकीय रुग्णालयात दररोज हजारो नागरीक येतात. रुग्णालयात स्वच्छतेची काळजी त्यांच्याकडून घेतली जात नाही. प्रशासन स्वच्छतेसाठी आटोकाट प्रयत्न करत असले, तरी नागरीकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छथा पसरल्याचे दिसते. स्वच्छतागृहे, रुग्णांचे वॉर्ड, व्हरांडे, जिने आदी ठिकाणी गुटखाबहाद्दर पिचकाऱ्या मारतात.
डॉ. नणंदकर यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदारी स्वरुपात कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु क्षमतेपेक्षा जास्त रूग्णसंख्येमुळे नातेवाईकांची गर्दीही मोठी असते. त्यामुळे कचरा जास्त प्रमाणात निर्माण होतो. यावर नियंत्रणासाठी सुरक्षा बलाच्या जवानांना कारवाईचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाच्या आवारत बेजबाबदारपणे थुंकणाऱ्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
निवारा शेड, शवविच्छेदन कक्षाचे काम लवकरचदरम्यान, रूग्णांच्या नातेवाईकांना रात्रीच्या निवाऱ्यासाठी शेड उभारले जाणार आहे. या कामासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. कामाला लवकरच सुरूवात होईल. १०० खाटांची इमारत धोकादायक झाल्याने तिचा वापर बंद केला आहे. त्यासाठी पर्यायी इमारतीचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाला सुरूवात होण्याची अपेक्षा आहे. शवविच्छेदनासाठीही नवा कक्ष बांधण्यात येणार आहे, त्यालाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.