सांगली : राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या गतीने सुरू करण्यात येत असून ज्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी जमिनी हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही पध्दतीने अडथळा आणल्यास संबंधितावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठीचे भूसंपादन - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, उपविभागीय अधिकारी मिरज डॉ. विकास खरात, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूरचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, वाबळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस. एन. निंबाळकर, उपअभियंता म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन सांगली दि. वि. खट्टे, कार्यकारी अभियंता महावितरण एस. ए. कोळी आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 नागपूर - रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासाठी मिरज तालुक्यातील 10 व कवठेमहांकाळ तालुक्यातील सोळा अशा एकूण 26 गावांमधील भूसंपादन करण्यात आले असून या 26 गावांचे निवाड्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. तसेच संपादित जमिनीसाठी मोबदल्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असून तीचे वितरणही त्वरीत करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेल्या ठिकाणच्या जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे त्वरीत हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये. अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या राष्ट्रीय महामार्गासाठी मिरज तालुक्यातील बामणी, निलजी, अंकली, इनामधामणी, टाकळी, भोसे, पाटगांव, कळंबी, मिरज व मालगाव तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी, देशिंग, लांडगेवाडी, केरेवाडी, निमज, हरोली, जाखापूर, बोरगांव, अलकूड एम, घोरपडी, आगळगांव, कुची, नागज, शेळकेवाडी, शिरढोण, जाधववाडी या गावांतील भूसंपादन करण्यात आले असून निवाड्यानुसार मंजूर रक्कमचे वितरण प्राधान्याने करण्यात येत आहे.जिल्ह्यातील अन्य राष्ट्रीय महामार्गांच्या अनुषंगीक कामांसाठी महसूल यंत्रणा तयार ठेवावी. ज्या कामांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा ठिकाणी पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. युटीलिटी शिफ्टींगबाबत संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.रस्ते कामांबरोबरच 22 तलावातील गाळही निघणार - डॉ. अभिजीत चौधरीपाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने या अभियानाची सांगड महामार्ग विकास कार्यक्रमाशी घालण्याचे निश्चित केले आहे. यामधून जलसंधारणाच्या कामांबरोबरच महामार्गांच्या कामांसाठी लागणारा मुरूम व मातीही उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ची कामे करीत असताना जिल्ह्यातील बोरगाव, शिरढोण, जाधववाडी, कुची, आगळगाव, जाखापूर, शेळकेवाडी, केरेवाडी, ढालगाव, आरेवाडी, रायवाडी, निमज या ठिकाणच्या एकूण 22 तलावातील गाळ व मुरूम काढण्यात येणार आहे. सदरची कामे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेवूनच करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.