सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत भाजपांतर्गत संघर्ष पेटला असताना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही गटांना गोपीनाथ मुंडे यांनी ‘सलाईन’वर ठेवल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. भाजपमधील उमेदवारी कोणाला मिळणार, यावर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपांतर्गत हालचालींवर पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबरच कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभेचा निकाल काय लागणार, यावर भाजपमधील उमेदवारीचे गणित ठरणार असल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारणे पसंत केले आहे. सांगलीतील भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत. आ. संभाजी पवारांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर चारच दिवसांनी नीता केळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंडेंची भेट घेऊन उमेदवारीविषयीची विचारणा केली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला गेल्यापासून हे दोन गट अस्तित्वात आले होते. पवार गटावरील नेत्यांची नाराजी अनेकांच्या फायद्याची ठरणार होती. त्यामुळे पवारांविरोधातील गट लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या मागे पूर्ण ताकदीने उभा होता. उमेदवाराविरुद्ध पवारांचा एकाकी लढा शेवटपर्यंत राहिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सांगली विधानसभा क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांकडून आश्चर्यकारक चाली खेळल्या जातील. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि आ. संभाजी पवार यांच्या गटातील वितुष्ट दिवसेंदिवस वाढत आहे. जयंत पाटील व मदन पाटील यांच्यातही फारसे सख्य नाही, तरीही पवारांच्या घरात उमेदवारी मिळाली तर कदाचित आघाडी धर्माच्या नावाखाली पवार गटाला शह देण्यासाठी जयंत पाटील यांचा गट मदन पाटील यांच्या बाजूने ताकद लावू शकतो. राष्टÑवादीतील दिनकर पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. संजय पाटील यांच्याप्रमाणे जर त्यांना पक्षप्रवेशावेळी भाजपकडून विधानसभेच्या उमेदवारीची लॉटरी लागली तर राष्टÑवादीचा एक मोठा गट त्यांना बळ देऊ शकेल. भाजपमध्ये जर निष्ठावंतांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली, तर सर्वच समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. येथील पटावर लोकसभेच्या देशभरातील निकालाचाही परिणाम निश्चितपणे जाणवेल. अशा अनेक गोष्टींमुळे सांगली विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
भाजपांतर्गत वादावर नेत्यांची सावध भूमिका विधानसभेची तयारी : उमेदवारी निश्चितीनंतर बदलणार मतदारसंघातील समीकरणे
By admin | Published: May 10, 2014 11:54 PM