सांगली : निवडणुकांमधील घोडेबाजार टाळण्यासाठी विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्यात आल्या. भाजपने त्यात पुढाकार घेतला, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरेकर आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता विधानपरिषद निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले की, विधानपरिषदेच्या निवडणुकांना बिनविरोधची परंपरा आहे. त्यामुळे भाजपने या परंपरेप्रमाणे निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. त्याचबरोबर निवडणुका झाल्या असत्या तर मोठा घोडेबाजार झाला असता. भाजपला असा घोडेबाजार नको आहे. भविष्यात राज्यात होणाऱ्या किंवा सध्या स्थानिक पातळ्यांवरील सर्व निवडणुका भाजप स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सत्ताबदल होणार हे आमचे भाकीत नसून खात्रीराज्यात येत्या काही महिन्यात सत्ताबदल होणार हे आमचे भाकीत नसून खात्री आहे. सरकार पडून मध्यावधी निवडणुका लागणार नसून भाजपचे सरकार सत्तेत येईल. आम्हाला कोण साथ देणार या गोष्टी आम्ही आताच उघड करणार नाही. याबाबत योग्यवेळी स्पष्टीकरण होईल. राज्यातील सर्वात मोठा पक्ष आमचा असल्याने आम्ही कोणाला साथ देणार नाही, तर एखादा पक्ष आम्हाला साथ देईल.राज्यात गेल्या दोन वर्षात एकाही प्रश्नाची सोडवणूक महाविकास आघाडी सरकारला करता आलेली नाही. बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अत्याचार, एसटी कर्मचारी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत आदी प्रश्न सरकारला सोडविता आलेले नाहीत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवरुन आम्ही सरकारला धारेवर धरु.‘त्या’ पापाचे धनी कोण?केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मृत्यूवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर दरेकर म्हणाले की, राज्यातील ३४ एसटी कर्मचाऱ्यांचे बळी आंदोलन काळात गेले. या पापाचे धनी कोण, हे राऊतांनी अगोदर स्पष्ट करावे.पूरग्रस्तांच्या यादीत बोगस नावेसांगली जिल्ह्यासह राज्यात महापूर, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, नागरिक व व्यापाऱ्यांना तुटपुंजी मदत देणाऱ्या या सरकारने लाभार्थ्यांच्या यादीत बोगस नावे घुसडली आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला.विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय घ्यावाएसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा. सर्वच महामंडळे नंतर विलीनीकरणाची मागणी करतील, हा दावा करणे योग्य नाही, असे दरेकर म्हणाले.
..म्हणून विधानपरिषदेत तडजोड, प्रविण दरेकरांनी दिले स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 5:23 PM