सातारा : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात झालेला पराभव राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अजूनही धगधगतो आहे. सोमवारी नवनियुक्त जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत सदस्यांच्या सत्काराच्या निमित्ताने नेत्यांनी ही सल पुन्हा बोलून दाखवली. त्यामुळे नवनियुक्त सदस्यांना सत्कार स्वीकारल्यानंतर पक्षनिष्ठेचे खडेबोलही ऐकावे लागले. राष्ट्रवादीच्या स्थापना वर्षापासून म्हणजे १९९९ पासूनच सातारा खासदार शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिला. जिल्ह्यातील स्थानिक नेतेमंडळींनीही खासदार शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या सल्ल्यानेच साताऱ्यातील राजकीय उलथापालथी केल्या. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी पक्षाच्या बहुमताची सत्ता आहे. बारामतीकरांच्या खलित्यानेच जिल्ह्यातील पदाधिकारी निवडले जात होते. पण गेल्या पाच वर्षांत काही मंडळींनी बारामतीकरांच्या खलित्याचा मुद्दा वादग्रस्त बनविला. जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी रामराजेंच्या सांगण्यावरून पदे सोडली नाहीत. त्यांच्यावर अविश्वास ठरावाची कारवाई करावी लागली. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी विरोधकांची बाजू धरल्याने अविश्वास ठराव बारगळला होता. राष्ट्रवादीला दुसरा झटका विधानपरिषदेतील पराभवाने बसला. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात काँगे्रसनेही मोर्चेबांधणी करून आमदार पतंगराव कदम यांचे बंधू आमदार मोहनराव कदम यांना उमेदवारी दिली. यावेळीही राष्ट्रवादी जवळपास ६० मते फुटल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातीलही मते फुटू शकतात, हे यानिमित्ताने सिद्ध झाले. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली. तसेच पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शाब्दिक डोसही त्यांना वारंवार पाजले. सध्या नव्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या कालावधीत विधानपरिषदेची निवडणूक लागणार नसल्याने ते मतदान करू शकणार नसले तरी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाला दगाफटका बसू नये, यासाठी आतापासूनच सावधानता बाळगल्याचे पाहायला मिळते आहे. ‘आम्हाला पदे देता येतात, तसेच ते काढूनही घेता येतात,’ अशा शब्दांत खुद्द आमदार अजित पवार यांनीच सोमवारी झालेल्या सत्कार सोहळ्यात सुनावले. ‘आक्रमकपणा कुठे वापरायचा, हे लक्षात असू द्या, तसेच सोशल मीडियाच्या जमान्यात कुठेही नाचून चालणार नाही,’ असा सल्लाही त्यांनी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचे नाव घेऊन दिला. ‘पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवला आहे,’ असे रामराजेंनी स्पष्ट केले. पक्षाची चौकट अधिक कडक करणे जरुरीचे आहे. कार्यकर्त्यांना अधिक ताकद देऊन लोकांना दिलासा मिळवून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहनही आमदार शिंदे यांनी सांगितले. एकूणच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच टाईट केल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मिळालेले निर्विवाद यश आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही टिकवून ठेवण्यासाठी आत्तापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तीन नेत्यांच्या अधिकारांवर शिक्कामोर्तबरामराजे, लक्ष्मणतात्या व आमदार शशिकांत शिंदे जी भूमिका घेतात, ती बारामतीकरांच्या आदेशानुसारच असते, याबाबतही यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागितला की तो द्यावाच लागणार, हेही स्पष्ट झाले.नावे कोणाची?‘राष्ट्रवादीशी गद्दारी करणाऱ्यांची यादी आम्ही पक्षनेत्यांना देतो, हे लोक आम्हाला पक्षात नको आहेत. त्यांना पहिल्यांदा पक्षातून बाजूला करा,’ अशी मागणीही रामराजेंनी यावेळी केली. या यादीत कोणाकोणाची नावे आहेत? याचे तर्कवितर्क लढविले जात आहे. पहिले नाव खासदारांचेच असणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
विधानपरिषदेचा पराभव अजूनही धगधगतोय !
By admin | Published: March 27, 2017 11:47 PM