दत्ता पाटील ल्ल तासगावतासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत अपवाद वगळता नवख्या चेहऱ्यांना खासदार संजयकाका पाटील यांनी संधी दिली. पारदर्शक कारभार आणि ठेकेदारीमुक्त कारभारी, असा अजेंडा घेऊन खासदारांनी पालिकेत भाजपची सत्ता काबीज केली. मात्र सत्तेत आलेल्या कारभाऱ्यांनी नव्याचे नऊ दिवस संपताच, खासदारांच्या अजेंड्याला हरताळ फासण्याचे उद्योग सुरु केले आहेत. टेंडर, ठेकेदारी आणि मक्तेदारीची पुनरावृत्ती करून, कारभारी नवे अन् कारभार जुनाच असल्याचे उद्योग सुरु केले आहेत. ठेकेदारीच्या निरंकुश कारभाराने डागाळत असलेल्या पालिकेच्या कारभाराबाबत खासदार संजयकाका कोणती भूमिका घेणार? याची उत्सुकता आहे.तासगाव नगरपालिकेत कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा पायंडा तसा फार जुना आहे. मात्र यावेळी झालेल्या निवडणुकीत खासदार संजयकाकांनी हा पायंडा मोडीत काढण्याचा निर्धार केला होता. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील, भाजप सत्तेत आल्यास पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली होती. खासदारांनीही जुन्या चुका टाळून पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले. त्यासाठी काही वादग्रस्त कारभाऱ्यांना उमेदवारी देतानाच बाजूला सारले, तर काहींना मतदारांनी बाजूला केले. त्यामुळे अपवाद वगळता बहुतांश नव्या दमाचे कारभारी पालिकेत आले. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्तधाऱ्यांकडून ठेकेदारीमुक्त कारभार होईल, अशी अपेक्षा तासगावकरांतून व्यक्त होत होती. मात्र सोमवारी पालिकेत ६० लाखांच्या निविदा प्रक्रियेवरून ठेकेदार आणि नगरसेवकांत झालेल्या खडाजंगीमुळे सत्ताधाऱ्यांच्या ठेकेदारीच्या कारभाराची चुणूक पाहायला मिळाली. पालिकेची बहुतांश कामे आजपर्यंत तासगावातील ठराविक ठेकेदार करत होते. ज्याची सत्ता, त्याच्या मर्जीतील ठेकेदार, असेच आजवरचे चित्र पाहायला मिळाले होते. शासनाकडून निविदा प्रक्रियेत पारदर्शीपणा आणण्यासाठी आॅनलाईन निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी केली. मात्र निविदा दाखल करतानाच संगनमताने मॅनेज होत असल्याने, ही प्रक्रिया केवळ सोपस्कार ठरत होती.यावेळी निविदा दाखल करण्यासाठी पहिल्यांदाच सांगलीतील एका ठेकेदाराने सहभाग घेतला. अर्थात हा सहभाग काही नगरसेवकांच्या पुढाकारानेच असल्याचे सोमवारी उघड झाले. बाहेरील ठेकेदारांच्या सहभागाला पालिकेच्या हिताचा गोंडस मुलामा काही नगरसेवकांकडून देण्यात आला. मात्र यानिमित्ताने पालिकेतील ठेकेदारी आणि टक्केवारीचा निरंकुश कारभारही पाहायला मिळाला. खासदारांनी मंजूर करुन आणलेल्या कोट्यवधींच्या निधीचा मलिदा लाटण्यासाठी कारभाऱ्यांकडून लुडबूड होत असल्यामुळे, ठेकेदारी आणि मक्तेदारीच्या कारभाराबाबत ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ असेच चित्र दिसून येत आहे. या निरंकुश कारभाराला खासदार संजयकाका कसा अंकुश लावतात, याची उत्सुकता आहे.
खासदारांच्या पारदर्शकतेला सत्ताधाऱ्यांचा हरताळ
By admin | Published: March 30, 2017 12:43 AM