सांगली : येथील शहर पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाने पोलीस ठाण्याच्याच टेरेसवर विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. अतुल विकास गर्जे-पाटील (वय ३६, रा. बदाम चौक, सांगली), असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सावकार महिला सुवर्णा पाटील हिच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत अतुल हे पत्नी, दोन मुली, आई भाऊ यांच्यासह बदाम चौक परिसरात वास्तव्यास होते, तर ते शहर पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी पोलीस ठाण्यातील सफाईचे काम पूर्ण झाल्यापासून ते कोणाला दिसले नव्हते.
सायंकाळी महापालिकेचे कर्मचारी केबलच्या दुरुस्तीसाठी पोलीस ठाण्यात आले होते. ते केबल दुरुस्तीसाठी ठाणे अंमलदाराच्या परवानगीने टेरेसवर गेले. यावेळी अतुल तिथे तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले. त्यांच्या शेजारी द्राक्षावरील औषध आढळले. त्या कर्मचाऱ्यांनी तातडीने खाली येत अंमलदारांना हा प्रकार सांगितल्यानंतर सर्व जण टेरेसवर गेले. पोलिसांनी तातडीने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोेषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. यात महिला सावकार सुवर्णा पाटील हिच्या वसुलीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यानुसार महिला सावकार सुवर्णा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अधिकाऱ्यांसह सर्वांनाच धक्का
मितभाषी व सर्वांशी आदराने बोलणाऱ्या अतुल यांनी आत्महत्या केल्याचे समजताच अधिकाऱ्यांसह सर्वांनाच धक्का बसला. अतुल यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘साहेब... मला माफ करा,’ असे म्हणत पत्नीला ‘मुलांची काळजी घे’ असे सांगितले आहे.
सावकारी पोलिसांच्या दारात
पोलीस दलात सफाई कर्मचारी असलेल्या अतुल यांच्या आत्महत्येमुळे सावकारीचा विळखा थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून आले. खासगी सावकारीविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असलीतरी सावकारांकडून सुरू असलेली वसुली आणि अरेरावीमुळेच हा प्रकार घडला आहे. महिला सावकार सुवर्णा पाटील हिच्यावर पोलिसांकडून कारवाई होऊनही तिने सावकारी सुरूच ठेवली होती.