बोरगाव : पुणे-बंगळुरू महामार्गावर पेठनाका ते नेर्लेदरम्यान अचानक महामार्गावर झेपावलेल्या बिबट्यास भरधाव माेटारीची धडक बसली. यानंतर महामार्गावर निपचित पडलेल्या बिबट्यास पाहून मदतीसाठी पुढे आलेल्या तरुणांची अचानक बिबट्या पुन्हा उठल्याने पळापळ झाली. या थरारनाट्यात रोहित पवार (रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) व उमेश खोत (रा. बोरगाव, ता. वाळवा) हे दाेघे सुदैवाने बचावले. जमावाच्या गाेंगाटात जखमी बिबट्या महामार्गाच्या बाजूने उसात पसार झाला. रविवारी रात्री पावणेनऊ वाजता हा थरारक प्रकार घडला.
पुणे-बेंगळुरू महामार्गावरून रोहित पवार व उमेश खोत हे कामानिमित्त नेर्लेकडे निघाले हाेते. पेठ ते नेर्ले दरम्यान त्यांच्यासमाेरच पश्चिम बाजूच्या उसाच्या शेतातून अचानक बिबट्या महामार्गावर आला. क्षणार्धात महामार्गावरून निघालेल्या भरधाव माेटारीची बिबट्याला धडक बसली. धडकेनंतर बिबट्या रस्त्यावरच निपचित पडला. बिबट्या ठार झाला असावा असे समजून माेटारीतील सर्व जण खाली उतरले. तसेच पवार व खाेत यांच्यासह अन्य प्रवासीही थांबले.
काही वेळ बिबट्याची काहीच हालचाल न झाल्याने तसेच महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने पवार व खाेत यांच्यासह जमावातील काही जण बिबट्या मृत झाल्याचे समजून बाजूला करण्यासाठी पुढे गेले. अचानक निपचित पडलेला बिबट्या हालचाल करीत जागेवरून उठला. दाेन पावले चालून ताे पुन्हा काेसळला. यानंतर पुन्हा जमाव पुढे झाला. यानंतर अचानक जमावाच्या दिशेने झेप घेत बिबट्याने रोहित पवार याच्यावर चाल केली. त्याची पॅन्ट पकडली. यावेळी माेठी पळापळ झाली. जमावाने आरडाओरडा व दगडफेक करताच बिबट्या पवार याला सोडून महामार्गाच्या पूर्वेच्या बाजूला शेतात सुसाट वेगाने पसार झाला.
ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. या घटनेच्या चित्रफितीही समाजमाध्यमांवर पसरल्या. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.