सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे सोमवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याने तीन तरुणांचा पाठलाग करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या दर्शनामुळे कर्नाळ परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाकडून परिसराची पाहणी करण्यात आली असून काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसेही मिळून आले आहेत.
कर्नाळ बिसूर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले. अविनाश जाधव हा तरुण बिसूर रस्त्यावरून कर्नाळकडे येत होतो. यावेळी बिबट्याने त्याचा पाठलाग केला. जाधव याने गावातील दोन मित्रांना बिबट्या दिसल्याचे सांगितले. पुन्हा तिघे बिसूर रस्त्यावर बिबट्याला पाहण्यासाठी आले. यावेळी बिबट्याने तिघांचाही पाठलाग करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तरुणांनी ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील यांना दिली. पाटील यांनी गावकऱ्यांसह धाव घेतली. वन विभागालाही कळविण्यात आले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. बिसूर रस्त्यावरील शेतात त्याच्या पायाचे ठसे मिळून आले. यापूर्वी सांगलीत बिबट्याला आला होता. शिराळा, वाळवा तालुक्यात बिबट्याचे दर्शन होत असते. मिरज तालुक्यातही बिबट्या आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.