इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कापूसखेड ते नेर्लेदरम्यान नातेवाइकांकडे आलेल्या बहीण-भावावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. मात्र, दुचाकीस्वार तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर बिबट्या उसाच्या शेतात पसार झाला.
कापूसखेड येथील अनिकेत पाटील आणि त्यांची बहीण दुचाकीवरून नेर्ले (ता. वाळवा) येथे नातेवाइकांकडे गेले होते. रात्री ९.३० वाजता कापूसखेडकडे परतत असताना नेर्ले येथील कदम वस्तीजवळ अचानक उसातून आलेल्या बिबट्याने अनिकेतच्या दुचाकीच्या दिशेने झेप घेतली. अनिकेतने प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला. तरीही, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला.
याचवेळी कासेगावचे काही तरुण दोन दुचाकींवरून कापूसखेडकडून नेर्लेकडे जात होते. बिबट्याने त्यांच्या दुचाकीचाही पाठलाग केला. या तरुणांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या रस्त्याकडेच्या उसात पसार झाला.
या तरुणांनी नेर्ले येथे येऊन ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. यानंतर कापूसखेड व नेर्ले येथील युवकांनी परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कापूसखेड ग्रामपंचायतीकडून गावात दवंडी देण्यात आली. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी कापूसखेड-नेर्लेदरम्यान दुचाकीवरून प्रवास करू नये, अशा सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या.