इस्लामपूर/कामेरी/गोटखिंडी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री साडेदहाच्या सुमारास इटकरे (ता. वाळवा) गावातून महामार्गास जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
महामार्ग गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी मृत अवस्थेतील बिबट्याला रस्ते दुभाजकाच्या जागेवर हलवले. बिबट्याचा नेमका मृत्यू कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, अज्ञात वाहनाच्या धडकेत ही घटना घडली असावी, अशी चर्चा होती.
ज्या परिसरात ही घटना घडली तो परिसर डोंगराच्या क्षेत्रात येत आहे. गोटखिंडीपासून ते येडेनिपाणी आणि त्यालगतचा सर्व परिसर हा डोंगराळ भागाचा आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांना दिसलेला बिबट्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर इटकरे फाट्यावर मृत अवस्थेत आढळला. महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला रस्त्यावरून बाजूला दुभाजकाच्या मोकळ्या जागेत ठेवले.
४ जानेवारी रोजी वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक रायन पाटोळे व वनमजूर यांनी या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. तो या घटनेने खरा ठरला आहे. वनमजुरांनी सोमवारी पाच दिवसांपूर्वी सकाळी या ठिकाणचे ठसे घेतले होते. त्यानंतर ग्रामस्थांचे प्रबोधन केले. हा बिबट्या मध्यमवयीन असावा, असा अंदाज व्यक्त करतानाच ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी. रात्री एकटे शेतात पाणी पाजण्यासाठी किंवा अन्य कामासाठी जाऊ नये. गटाने फिरावे, हातात काठी व बॅटरी ठेवावी, असे आवाहन वनपाल शिंदे यांनी केले होते. तसेच वनविभागाने रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी गस्त पथक तयार केले असून वनपाल, वनरक्षक व दोन वनमजूर यांचे हे पथक असणार असल्याचे सांगितले होते. कोणत्याही अडचणीसाठी वनपाल शिंदे यांनी ९५२९५३०५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे 'लोकमत'शी बोलताना सांगितले होते. इटकरे परिसरात पाझर तलाव, तुकाई डोंगर, महामार्ग भागात गेल्या महिन्यापासून बिबट्याचे दर्शन होत असल्याचे अनेकानी सांगितले होते. मात्र, आजच्या घटनेने गावालगत बिबट्या वावरत होता हे स्पष्ट झाले आहे.