वाळवा : गाताडवाडी-लोणारवाडी परिसरातून बिबट्याने तुजारपूर, अहिरवाडी आणि वाळव्याच्या हद्दीत प्रवेश केला आहे. तुजारपूर, अहिरवाडी व वाळवा येथील शेतमजुरी करणाऱ्यांना त्याचे दर्शन झाले आहे. वाळवा हद्दीत बजरंग मुसळे यांनी बिबट्या पाहिला आहे.
अहिरवाडी मार्गावर वाळवा व अहिरवाडीत खूप झाडी-झुडपे आहेत. हीच परिस्थिती नजीकच्या बावची रस्ता परिसरात आहे. तुजारपूर व अहिरवाडीच्या काही भागात झाडी-झुडपे असल्याने त्याला मोठी दडण आहे. शिवाय वाळवा हद्दीत उसाचे आगर पण आहे. या परिसरात शेतमजूर व शेतकरी यांच्याव्यतिरिक्त जास्त रहदारी नाही. येथे काही शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.
वाळवा-इस्लामपूर रस्ता, वाळवा-आष्टा रस्ता, बावची रस्ता, पडवळवाडी रस्ता, अहिरवाडी रस्ता, सर्व ओढ्याकाठचा भाग याठिकाणी काटेरी झाडी विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्याला सुरक्षितता आहे. परंतु बिबट्याच्या भीतीने शेतमजूर रानात यायला तयार नाहीत. सध्या गावगड्यांकडून ऊसतोडणी चालू आहे. द्राक्षबागेतील कामे सुरू आहेत. ज्वारीच्या शेतीतील ज्वारी पोटऱ्याला आली असल्याने व हरभरा पीक तयार झाले असल्याने शेतीत कामे सुरू आहेत. हा बराचसा भाग निर्जन आहे. वन विभागाने या सर्व परिसराची पाहणी करून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.