सांगली : अंकली (ता. मिरज) परिसरात बुधवारी रात्री बिबट्या दिसल्याची चर्चा होती. याबाबत माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस व वन विभागाच्या पथकाने या परिसरात धाव घेतली. वन विभागाचे पथक अंकली भागात असून, नागरिकांना दिसलेला प्राणी नेमका बिबट्या की अन्य काेणता? याबाबत शोध घेतला जात असल्याचे वनसंरक्षक डॉ. अजित साजने यांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील अंकली, धामणी परिसरात बुधवारी रात्री उशिरा बिबट्या दिसल्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांवरून सुरू झाली. यानंतर पोलिसांचे पथक या भागात दाखल झाले. त्यानंतर माहिती मिळताच वन विभागाचे पथकही रवाना झाले. वन विभागाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत नेमका बिबट्या की अन्य कोणता प्राणी आल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे.