सदानंद औंधे मिरज : मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर व आतिक सतारमेकर यांनी तंतुवाद्यनिर्मितीचे धडे जपानी संगीतप्रेमींना दिले. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळेसाठी आमंत्रित सतारमेकर पिता-पुत्रांनी जपानमधील टोकियो, कानागावा या शहरात कार्यशाळेत प्रशिक्षण दिले. जपानी संगीतप्रेमींच्या आदरातिथ्याने सतारमेकर यांचा जपान दौरा संस्मरणीय ठरला.मिरजेतील सतार व तंबोरा या तंतुवाद्यांची जगभर ख्याती आहे. सुमारे दीडशे वर्षे येथे तंतुवाद्यनिर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक गायक-वादक मिरजेतील वाद्यांना पसंती देतात. भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असलेले परदेशी नागरिकही मिरजेतील वाद्यांची मागणी करतात.भारतीय शास्त्रीय संगीताचा लौकिक जगभर असल्याने विविध देशातील संगीतप्रेमींना भारतीय तंतुवाद्याविषयी कुतूहल, जिज्ञासा आहे. ही वाद्ये कशी तयार करतात? याची माहिती होण्यासाठी जपानमधील ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्यनिर्मितीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेमार्फत तंतुवाद्यनिर्मिती कार्यशाळेसाठी मिरजेतील मजीद सतारमेकर आणि आतिक सतारमेकर यांना जपानमध्ये आमंत्रित करण्यात आले.ध्रुपद सोसायटी ही संस्था गेली अनेक वर्षे जपानमधील संगीतप्रेमींना भारतीय संगीताचे शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या ह्यमारिको कटसुराह्ण या उत्तम गायक आहेत. त्या उस्ताद फरिदोद्दीन डागर आणि डॉ. ऋत्विक संन्याल यांच्या शिष्या आहेत.
मारिको कटसुरा, नावो सुझुकी या भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी वाराणसीला अनेकदा येऊन गेल्या आहेत. त्यांनी या अभिनव कार्यशाळेसाठी संस्थेतर्फे प्रवास व निवासाची सोय करून सतारमेकर पिता-पुत्रांना जपानमध्ये पाचारण केले.
दहा दिवसांच्या या कार्यशाळेत मजीद व आतिक सतारमेकर यांनी तंतुवाद्य निर्मिती कशी होते, त्याला तारा कशा बसवल्या जातात, गायकीनुसार जवारी कशी लावली जाते, विविध तंतुवाद्यांमध्ये काय फरक असतो, सतारीचा भोपळा कोठे मिळतो, लाकूड कोणते वापरण्यात येते, याची माहिती जपानी संगीतप्रेमींना प्रात्यक्षिकासह दिली.टोकियो, कानागावा या शहरात पार पडलेल्या कार्यशाळेत सुमारे शंभरांवर संगीतप्रेमींनी तंतुवाद्यांची सतारमेकर यांनी हिंदीत सांगितलेली माहिती मारिको कटसुरा यांनी जपानी भाषांतर करून सांगितली. काही जपानी मंडळींकडे असलेली तंतुवाद्ये सतारमेकर यांनी दुरूस्त केली. तंतुवाद्यनिर्मितीबाबत जपानमध्ये होणाऱ्या या पहिल्याच कार्यशाळेसाठी जपानमध्ये गेलेल्या मजीद व आतिक सतारमेकर यांचे जपानी संगीतप्रेमींनी आपुलकीने आदरातिथ्य केले.
लिझा नकाता यासह काही जपानी गायकांनी सतारमेकर यांची आवर्जून भेट घेतली. ध्रुपद हा भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आहे. शिकण्यासाठी अत्यंत कठीण अशी ध्रुपद गायकी शिकण्यासाठी जपानी मंडळी परिश्रम करीत आहेत.जपानमधील रस्ते, स्वच्छता व एकूणच श्रीमंती डोळे दीपविणारी होती. पहिल्याच परदेश प्रवासाने व आदरातिथ्याने भारावून गेल्याचे व जपानी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करीत आहेत. हा भारतीय परंपरेचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.