सांगली : अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा (बॅरेज) येथील अधीक्षक अभियंते, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते यांची सांगलीत महापूर रोखण्यासाठी समन्वयाची बैठक लवकरच घेतली जाईल, अशी ग्वाही सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता पाटोळे यांची भेट घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, माने, सुयोग हावळ उपस्थित होते.महापूर नियंत्रण समितीतर्फे नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे अभ्यास दौरा केला आहे. त्याबद्दल माहिती देण्यात आली. कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत एकात्मिक धरण परिचलनासाठी दोन्ही राज्यांतील अधीक्षक अभियंत्यांची सांगलीत बैठक होणे आवश्यक असल्याचे यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले. त्यावर चंद्रशेखर पाटोळे यांनी अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा यांच्या अधीक्षक अभियंत्यांसह सांगलीत लवकरच समन्वय बैठक घेऊ ,असे सांगितले. यावेळी कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंत्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करू, असेही ते म्हणाले.
केंद्रीय जल आयोगाच्या नियमांकडे दुर्लक्षकोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंतच्या सर्व धरणातील दैनिक पाणी पातळी, आवक-जावक, विसर्ग यांच्या माहितीची दोन्ही राज्यांमध्ये देवाणघेवाण व्हावी. कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी बंधाऱ्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नाही. धरणातील पाणीसाठा वाढवण्याकडे त्यांचा अधिक भर असतो, असे दिसून येत आहे, असाही निष्कर्ष समितीतर्फे अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्यासमोर मांडला.
पूर सनियंत्रण समितीची स्थापना करा : विजयकुमार दिवाणसांगली-कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांची पूर सनियंत्रण समिती स्थापन करावी. या समितीत संबंधित सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, जलविज्ञान, सीडब्ल्यूसीचे तज्ज्ञ असावेत. या समितीच्या माध्यमातून धरणांचे एकात्मिक परिचलन व्हावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.
आयआयटी रुरकी समितीने अहवाल द्यावामहापुरासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करावा, अशी सूचना सांगली पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयआयटी रुरकी संस्थेच्या समितीला केली आहे. महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आश्वासन समितीच्या सदस्यांनी दिले आहे. महापुराच्या कारणांचा तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयआयटी रुरकी संस्थेला कळविले होते. त्यानुसार या संस्थेने डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे, अभियंता जे. के. पात्रा यांची समिती स्थापन केली.