श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ही त्यांची टॅगलाईन, तर ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही कॅचलाईन! त्यात राजकीय धेंडांसोबतची ऊठबस. मग ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागं’ अशी सगळ्या गुंतवणूकदारांची गत झाली. बघता-बघता कडकनाथ कोंबडीपालनात ‘रयत अॅग्रो’चा बोलबाला झाला. मग ती ‘महारयत अॅग्रो’ झाली. आठ ते दहा हजारजणांनी गुंतवणूक केली आणि तिथंच फसगत झाली. वर्ष-सहा महिन्यातच अंडी-कोंबड्यांचा उठाव थांबला. अर्थचक्रालाच खीळ बसली... त्यातून समोर आली पाचशे कोटीची फसवणूक!सध्या बहुचर्चित बनलेल्या या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती महाराष्टÑ-कर्नाटकपुरती मर्यादित नसून गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडपर्यंत पोहोचली आहे. कडकनाथ जातीच्या कोंबडीचा भुलभुलैय्या आणि दक्षिण महाराष्टÑातील ‘रयत’ या नावाची चलती वापरून घेत ‘रयत अॅग्रो’ या कंपनीच्या महाठग संचालकांनी लोकांना फशी पाडले. त्यासाठी ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही वरवर साधीसोपी वाटणारी योजना राबवली.सुरुवातीला केवळ ७५ हजार रुपये गुंतवायचे. तेही दोन टप्प्यात. ४० हजार रुपये बुकिंग करताना, तर उरलेले ३५ हजार रुपये तीन महिन्यांनंतर. त्याबदल्यात कडकनाथ जातीचे २०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी मिळायची. गुंतवणूकदाराने स्वत:च्या शेडमध्ये ही पिले सांभाळायला सुरुवात केल्यानंतर तीन महिन्यांनी कंपनी त्यातल्या ८० कोंबड्या घेत असे. त्यावेळी गुंतवणूकदाराकडे १०० मादी व २० नर शिल्लक ठेवण्यात येत. चार महिन्यांपासून या कोंबड्या अंडी देऊ लागल्यानंतर पुढील सहा महिने कंपनी सुरुवातीची २००० अंडी सरासरी ५० रुपये, नंतरची २००० अंडी ३० रुपये, तर अखेरची ३५०० अंडी २० रुपये दराने खरेदी करत असे. त्यातून गुंतवणूकदाराला दोन लाख तीस हजार रुपये मिळत. दहाव्या महिन्यांपर्यंत टिकलेल्या कोंबड्या ३७५ रुपये दराने खरेदी करण्याची हमी देण्यात आली होती. त्यातून सुमारे ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. असे अवघ्या दहा महिन्यांत २ लाख ७५ हजार रुपये मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले.‘रयतअॅग्रो’च्या संचालकांची राजकीय धेंडांसोबतची ऊठबस कामी आली. ‘बॅकिंग’ मिळालं. मग कंपनीचे मुख्य कार्यालय सांगली जिल्ह्णातल्या इस्लामपूरमध्ये थाटले गेले. तेथेच व्यवहार आणि करार व्हायचे. हळूहळू कंपनीची १५ कार्यालये झाली. इस्लामपूर-कोल्हापूरपासून पार नागपूर-औरंगाबाद-पुणे-बेळगावपर्यंत. गावखेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतच्या हॉटेल्स, ढाब्यांवर ‘कडकनाथ’ कोंबड्यांना खवैय्यांची मोठी पसंती असल्याची पुस्ती जोडली गेली. काहींनी शेतीला जोडधंदा म्हणून, काहींनी पूर्णवेळचा धंदा म्हणून, तर काहींनी आयुष्याची पुंजी एकत्र करून पैसे गुंतवले. शेड उभी केली...वर्षभरापूर्वी आणल्या गेलेल्या या योजनेतून सुरुवातीच्या काळात काही जणांना अंडी-पक्षी खरेदीतून कंपनीने परतावा दिला. ज्यांनी कमवले, तेच कंपनीचे स्टार प्रचारक झाले. त्यातल्या काहींना तर एजंट म्हणून नेमण्यात आले. त्यांनी ‘माऊथ पब्लिसिटी’ केली. गुंतवणूकदार वाढले... आणि त्यानंतर कंपनीचे सगळेच व्यवहार लांबू लागले. गेल्या चार महिन्यांत तर ते थांबलेच. कारण अंडी-पक्ष्यांचे उत्पादन अमाप आणि उठाव कमी!डिसेंबरपासून घरघरकंपनीने सुरुवातीला पक्षी आणि खाद्य व्यवस्थित पुरविले. अंड्यांचे पैसे वेळेवर दिले. मुदतीनंतर पक्षी उचलले. ते पाहून बुकिंग वाढले. परंतु फेब्रुवारीपासून ‘कडकनाथ’ला घरघर लागली. कंपनीने खाद्यामध्ये अनियमितता आणली. अंडी नेली, पण त्याचे पैसे दिले नाहीत. गुंतवणूकदारांनी दोन-तीन महिने स्वत:च्या पैशाने खाद्य घातले. सध्या कंपनीच्या सगळ्याच कार्यालयांना टाळे लागले आहे.
एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:36 AM