सांगली : कोरोना काळातील वीज बिल माफीचे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने शब्द फिरवून वीज बिलाची थकबाकी असणाऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा तोडण्यास येणाऱ्यांना आम्ही जोड्याने मारू, असा इशारा भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वांचीच परिस्थिती बिकट बनली होती. त्याचा विचार न करता शासनाने वीजपुरवठा तोडण्याचे दिलेले आदेश तुघलकी आहेत. विजेची अमाप बिले आली आहेत. राज्य सरकारने या काळातील बिले माफ करणार असल्याचे सांगितले होते. अडचणीच्या काळात जनतेला आधार व मदतीची गरज असताना शासनाने थकबाकी असणाऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश देऊन सर्वांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ही सरकारची हुकूमशाही आहे.
भाजपने जिल्ह्यात २० जणांची टीम केली आहे. वीज कनेक्शन तोडू नये यासाठी आम्ही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे. आमच्या मागणीची दखल न घेतल्यास पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करू. शासनाने कोरोनाच्या काळातील बिले माफ करून उर्वरित बिले टप्प्याटप्प्याने भरून घ्यावी. यावेळी श्रीकांत वाघमोडे, प्रियानंद कांबळे, धनेश कातगडे, ज्योती कांबळे, माधुरी वसगडेकर, राहुल माने, अमित भोसले, संगीता जाधव, राजू जाधव, आदी उपस्थित होते.