लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीला जागा मिळवून देण्यासाठी महापालिका तसेच शासनाच्या स्तरावर प्रयत्न करू. हा प्रश्न तातडीने मार्गी लावू, अशी ग्वाही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी दिली.
वडर कॉलनी येथील ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची पाहणी आयुक्त कापडणीस यांनी केली. यावेळी रेव्ह. अशोक लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन देण्यात आले. लोंढे म्हणाले, ख्रिश्चन समाजाच्या वडर कॉलनी येथील सध्याच्या दफनभूमीतील जागा संपली आहे. नवीन जागा नसल्याने याच ठिकाणी दफनविधी करण्याशिवाय पर्याय नाही. महापालिकेने शामरावनगर येथील स. न. ५०७ या दफनभूमीसाठी आरक्षित सहा एकर जागेपैकी दीड एकर जागा ख्रिश्चन समाजाला देण्याचा ठराव केला आहे. ठराव होऊन जवळपास तीन वर्षे उलटली तरी अद्याप या जागेचे महापालिकेने भूसंपादन केलेले नाही. तातडीने हे भूसंपादन करून समाजाला दफनभूमीसाठी जागा द्यावी, अशी मागणी केली.
आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, स. नं. ५०७ मधील आरक्षित जागा संपादन करण्याचे काम सुरू आहेत. जागामालकास टीडीआर नको आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता या आरक्षित सहा एकरपैकी ख्रिश्चन समाजासाठी लागणारी दीड एकर जागा पहिल्या टप्प्यात भूसंपादन करू, यासाठी शासन व जिल्हा नियोजन समितीकडूनही काही निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पास्टर सतीश घाटगे, सॅमसन इम्मानुएल, जॉन आरवाट्टगी, यहोशवा मद्रासी, सागर समुद्रे, विजय वायदंडे, राजेंद्र वायदंडे, गणेश मद्रासी यांच्यासह मदनभाऊ युवा मंचचे जिल्हा कार्याध्यक्ष शीतल लोंढे, जालिंदर आवळे, शिरीष काळे, किशोर सपकाळ, सूर्यकांत लोंढे, कपिल आवळे, निलेश आवळे, रोहन मोरे, आकाश लोंढे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ :- महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी ख्रिश्चन दफनभूमीची पाहणी केली. यावेळी रेव्ह. अशोक लोंढे व इतर धर्मगुरुंनी निवेदन दिले.