लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालये, विद्युत व्यवस्था यासह अन्य घरगुती सुविधांचा जिल्ह्याचा स्तर गेल्या पाच वर्षांत कमालीचा सुधारला असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. पाणी आणि वीज या स्तरावर मोठी सुधारणा जिल्ह्यात झाली आहे.
घरगुती सुविधा आणि मालमत्तांचा सर्व्हे जनगणनेत होत असताे. कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातही काही महत्त्वाच्या सुविधांचे सर्वेक्षण करण्यात येते. केंद्र शासनाच्या आराेग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत नुकतीच याबाबतची आकडेवारी जाहीर झाली. यात सांगली जिल्ह्यातील घरगुती सुविधांचा स्तर उंचावत असल्याचे दिसून आले. अशा सुविधांचे वापरकर्ते दरवर्षी वाढत आहेत. २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील विद्युत व्यवस्था असलेल्या घरांची संख्या ९२.५ टक्के होती, ती २०१९-२० मध्ये ९८.२ टक्के झाली आहे. येत्या वर्ष-दीड वर्षात जिल्ह्यातील शंभर टक्के घरे विद्युत व्यवस्थेने उजळतील.
चौकट
पाण्याची उपलब्धता समाधानकारक
जिल्ह्यातील २०१५-१६ या वर्षात घरांच्या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे प्रमाण ९६.१ टक्के इतके होते. २०१९-२० मध्ये हे प्रमाण ९६.८ टक्के इतके झाले आहे. यामध्ये नळपाण्यापासून विहिरी, कूपनलिका, पाण्याचे टँकर, सार्वजनिक आरओ प्लॅन्ट यांच्यासह अन्य सुविधांचा समावेश आहे.
चौकट
सार्वजनिक स्वच्छतेची सुविधा उपलब्ध असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण २०१५-१६ या वर्षात ७२.१ इतके कमी होते, ते आता ८४.७ टक्के झाले आहे. यामध्ये ड्रेनेज, गटारी, शोषखड्डे, वैयक्तिक शौचालये आदींचा समावेश आहे.
चौकट
गॅस, बायोगॅस, विद्युत स्वरूपातील सुरक्षित आरोग्यदायी इंधनाचा वापर करणाऱ्या कुटुंबांची संख्या जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात ६३.२ इतकी होती. ती आता ८७.३ इतकी वाढली आहे.
चौकट
आर्थिक नियोजनात सुधारणा
जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात विमा संरक्षण किंवा आर्थिक गुंतवणूक योजनेत सहभागी असलेल्या कुटुंबांचे प्रमाण १०.३ टक्के होते, ते आता १२.३ टक्के झाले आहे.
जिल्ह्यातील कुटुंबसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण कुटुंबे ५,८५,२२७
ग्रामीण ४,३२,५७९
नागरी १,५२,६४८