सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजयकुमार चौगुले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला असून, त्यांच्या रूग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. चौगुले दाम्पत्याची वैद्यकीय सनद रद्द करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मेडिकल कौन्सिलला सादर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. चौगुले दाम्पत्याच्या बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उजेडात आल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेत कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, गणेशनगर येथील पाचव्या गल्लीतील चौगुले हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात गर्भपातासह भ्रूणहत्येचा प्रकार समोर आला आहे. डॉ. रूपाली चौगुले व तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले हे दोघेही शासकीय सेवेत असताना त्यांच्याकडून भ्रूणहत्येसारखा प्रकार घडल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसारच सोमवारी दुपारीच आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दोघांच्याही निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. यावर तातडीने कार्यवाही होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महापालिकेनेही या रुग्णालयाला दिलेला नोंदणी परवाना रद्द केला आहे. भ्रूणहत्येसारखे गंभीर प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी या दोघांचीही वैद्यकीय सनद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिलला पाठविण्यात येणार आहे.चौगुले दाम्पत्यावर कारवाई करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि विधी विभागातर्फे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा सरकारी वकील अॅड. उल्हास चिप्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर आदी उपस्थित होते.नातेवाइकांकडून भ्रूणांची विल्हेवाटभ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाइकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. नागाव कवठे (ता. तासगाव) येथील महिलेचा गर्भपात केल्यानंतर मृत भ्रूण तिच्या नातेवाइकांनी शेतात पुरल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतात खोदकाम करुन शोध सुरु ठेवला आहे.
गर्भपातप्रकरणी चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:05 AM