सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकित बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. शुक्रवारी दुपारी अध्यक्ष विशाल पाटील यांच्या घरासमोर ‘भाकरी माग’ आंदोलनही करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना गेटसमोर थकित बिलांच्या मागणीच्या घोषणा देत धरणे आंदोलनास सुरुवात केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, २८ डिसेंबर रोजी संघटनेने थकित बिलांच्या प्रश्नावर कारखाना प्रशासनास तसेच अध्यक्षांना निवेदन दिले होते. या निवेदनाची कोणतीही दखल कारखान्याने घेतली नाही. शेतकऱ्यांची २0१३-१४ पासूनची ऊस बिले थकित आहेत. त्यावर्षीचे १३ कोटी, १४-१५ च्या हंगामातील ५ कोटी थकित आहेत. २0१५-१६ च्या हंगामातील केवळ पंधरा दिवसांचीच बिले शेतकऱ्यांना मिळाली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना, कारखाना चालक शेतकऱ्यांच्या बिलाबाबत मौन बाळगून आहेत.इतक्या वर्षांची बिले थकित कशासाठी ठेवली आहेत? शासन आदेशानुसार एफआरपीसाठी जिल्हा बँकेकडून वसंतदादा कारखान्याला अर्थपुरवठाही झाला आहे. हे पैसे गेले कुठे?, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांची थकित व चालू बिले ताबडतोब द्यावीत, जोपर्यंत ही बिले मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कारखाना चालकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, प्रवक्ते महेश खराडे, संभाजी मेंढे, संजय बेले, बी. आर. पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)भाकरी मागणारआंदोलनकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून याप्रश्नी लोकांचे, तसेच कारखान्याचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. खराडे म्हणाले की, शुक्रवारी दुपारी परिसरातील घरांमधून भाकरी मागण्याचे आंदोलन करण्यात येईल. याची सुरुवात कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या घरापासून होईल. मागून आणलेली भाजी-भाकरी खाऊन कारखान्यासमोर ठिय्या सुरू राहील.
वसंतदादा कारखान्यासमोर धरणे
By admin | Published: January 07, 2016 11:52 PM