जत : संत आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून आपल्याला सन्मार्ग दाखविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आपण नेहमी संतसंगतीचा लाभ घ्यावा, असे मत ह. भ. प. सुशांत जाधव महाराज (वडजलकर) यांनी व्यक्ती केले.
जत येथील राजे शिवाजी महाराज नगर येथे नव्यानेच बांधलेल्या स्वामी समर्थ मंदिराचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आपण चांगल्याच्या संगतीत राहिलो तर आपले चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. वाईटाच्या संगतीत राहिलो तर आपले वाईटच होत राहणार आहे. त्यामुळे संतांची संगत धरुन नित्य ज्ञानेश्वरी व हरिपाठाचे पठण केले, तर आपण परमेश्वराशी एकरूप होऊ.
स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब पवार यांनी स्वत:ची साडेपाच गुंठे जागा स्वामी समर्थ मंदिरासाठी दिली आहे. या जागेवर मंदिराची उभारणी केली आहे. यावेळी पांडुरंग वझे, अनिरुद्ध वझे, हिंचगिरी संप्रदाय, जुनोनी मठाचे मठाधीपती स. स. धोंडोपंत महाराज, कीर्तनकार सागर महाराज बोराटे, जुनोनी मठाचे मठाधीपती कवले महाराज, डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी, सुनील पाथरुट, सुरेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ट्रस्टचे अध्यक्ष बापुसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, श्रीकृष्ण पाटील, दीपक पाटणकर, नारायण पवार, मोहन पवार, शंकर वाघमोडे, सदाशिव जाधव यानी केले.