लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जमीन दाव्याच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने कुटुंबाला व्यवस्थित सांभाळू शकत नसल्याच्या नैराश्यातून आई, पत्नी व दोन मुलींचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. भारत कुंडलिक इरकर (वय ४९, रा. कुडनूर, ता. जत) असे आरोपीचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
या खटल्याची हकीकत अशी की, आरोपी इरकर सावत्र आई जनाबाई कुंडलिक इरकर हिच्यासोबत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत आला होता. वाढत्या खर्चामुळे पत्नी, मुलांना सांभाळू शकत नाही, या नैराश्यातून १० सप्टेंबर २०१६ रोजी पहाटेच्या सुमारास त्याने आई सुशिला, बायका सिंधूताई, मुलगी रूपाली आणि राणी यांचा शेतात धारदार हत्याराने डोक्यात, मानेवर वार करून डोके व चेहरा छिन्नविछिन्न करत खून केला होता. या घटनेत एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी नाना तुकाराम माने, आरोपीचा मुलगा म्हाळाप्पा इरकर, तपास अधिकारी युवराज मोहिते व तत्कालिन न्याय दंडाधिकारी समीर कामत यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
चौकट
आर्थिक अडचणीतून कुटुंब उद्ध्वस्त
आरोपी भारत इरकर आई, पत्नी, दोन मुली व दोन मुलांसह राहण्यास होता. भारत व त्याची सावत्र आई जनाबाई यांच्यात जमिनीचा वाद होता. जिल्हा न्यायालयाने भारतच्या बाजूने निकाल दिला होता, तर जनाबाईने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. तेथे तिच्या बाजूने निकाल लागल्याने भारत निराश झाला होता.