ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 24 - अनैतिक संबंधातून दरीबडची (ता. जत) येथील जंगलात दीड वर्षाच्या चिमुरडीसह तिच्या आईचा खून करणाऱ्या तिकोटा (जि. विजापूर) येथील चिदानंद हणमंत कोणूर (वय २८) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. पी. तावडे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.अनिता मड्याप्पा कोणूर (२५) व तिची मुलगी वैष्णवी (३ वर्षे) यांचा चिदानंदने डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून केला होता. ६ जून २०१४ रोजी ही घटना घडली होती. चिदानंद अनिताचा जवळचा नातेवाईक लागत असल्याने, त्यांची ओळख होती. यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले होते. अनिताला ऋतिक व वैष्णवी ही दोन मुले होती. चिदानंदशी संसार थाटण्याच्या उद्देशाने अनिता केवळ मुलीला घेऊन पळून गेली होती. पण पंधरा दिवसानंतर ती परत पतीच्या घरी आली होती. पतीने पंचासमक्ष तिच्याकडून कबूलनामा घेतला होता. पंधरा-वीस दिवस राहिल्यानंतर ती पुन्हहा वैष्णवीला घेऊन पळून गेली होती.चिदानंदसोबत ती गारगोटी (जि. कोल्हापूर ) येथे राहू लागली. चिदानंदला दारूचे व्यसन होते. त्या नशेत तो अनिताला मारहाण करू लागला. त्याच्या मारहाणीला ती कंटाळली होती. तिला मुलगा ऋतिकची आठवण येत होती. ह्यमाझ्या पतीकडे मला सोड, असा हट्ट तिने धरला होता. त्यामुळे तो अनितावर चिडून होता. अनिता पतीकडे गेली, तर ती परत येणार नाही, असे त्याला वाटत होते. त्यामुळे तिने तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले होते. अनिता व वैष्णवीला पतीकडे सोडण्याचा बहाणा करून त्याने दुचाकीवरून दरीबडची येथील पशुुवैद्यकीय दवाखान्यासमोरील जंगलात नेले. तेथे दोघींच्या डोक्यात हातोडा घालून त्यांचा खून केला होता. या घटनेनंतर तिसऱ्यादिवशी त्याला पकडण्यात यश आले होते.कडक शिक्षेची मागणीया खटल्यात नऊ साक्षीदार तपासले. अनिताची आई, वैद्यकीय अधिकारी, चिदानंदने ज्या दुकानातून दारू घेतली, त्या दुकानाचा मालक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने चिदानंदला शनिवारी दोषी ठरवून शिक्षेबाबतचा निकाल मंगळवारपर्यंत राखून ठेवला होता. मंगळवारी दुपारी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी त्याला कडक शिक्षा देण्याबाबत युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मायलेकींच्या खुनातील आरोपीला जन्मठेप
By admin | Published: January 24, 2017 8:05 PM