सांगली : जमिनीच्या वादातून ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील एकाचा खून केल्याप्रकरणी सुखदेव बाळकू घागरे (वय ५०, रा. पुजारी वस्ती, ढालगाव) यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. अरविंद देशमुख व अतिरिक्त सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.
खटल्याची माहिती अशी की, फिर्यादी अशोक पुजारी यांचा चुलत भाऊ असलेले श्रीमंत दामू पुजारी यांचा आरोपी घागरे याने खून केला होता. अशोक व त्यांचे चुलते २५ एकर जमीन कुळकायद्याने कसत होते. या जमिनीपैकी साडेबारा एकर जमीन आरोपी व इतर लोकांनी जमीन मालकाकडून खरेदी केली होती. याबाबत न्यायालयात दावा न्यायप्रविष्ठ होता.
२ मे २०१६ राेजी सायंकाळी सहाच्या सुमारास श्रीमंत पुजारी व आरोपीमध्ये वादावादी सुरू होती. याच वादातून आरोपी घागरे याने पुजारी यांचा डावा हात पकडून पाठीमागून डोक्यात कु्ऱ्हाडीचा घाव घातला. यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अशोक पुजारी यांनी फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार घागरे याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी पुरावा व कागदोपत्री पुरावा यांचा विचार करण्यात आला व त्यास जन्मठेप व पाच हजार दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली.
-------------------
फोटो २३ सुखदेव घागरे एडीटोरियल