सांगली : बेरोजगारीच्या चिंतेच्या झळा असह्य होत असतानाच पेट्रोल दरवाढीच्या माध्यमातून महागाईचा आगडोंब उसळला आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जवळपास सहा वेळा पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ करून महागाईच्या आगीत तेल ओतले. गेल्या तीन वर्षांत तब्बल ८३.९० रुपये प्रतिलिटर पेट्रोलचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे रोजगार व आर्थिक स्तर त्याप्रमाणात वाढला नाही.
कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेला आहे; तर दुसरीकडे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. सरकारचे इंधन दरवाढीवर नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचा फायदा ग्राहकांना न देता केंद्र सरकार उत्पादन कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवीत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.
पेट्रोलियम कंपन्या मध्यरात्री काही पैशांची दरवाढ करून ग्राहकांच्या खिशातून छुप्या पद्धतीने पैसे वसूल करीत आहेत. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या दरवाढीने १३ मे २०२१ रोजी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९८.५२ रुपयांवर पोहोचले आहेत. कोरोनाच्या काळात आयुष्य ‘लॉक’ असतानाही पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ आहे. दरवाढीचा आलेख पाहता गेल्या ३० वर्षांत पेट्रोलची लिटरमागे जवळपास ८३ रुपयांची वाढ झाली आहे.
पेट्रोल दर (प्रतिलिटर) (ग्राफ)
मे १९९१ १४.६२ रुपये
मे २००१ २७.३६ रुपये
मे २०११ ६८.३३ रुपये
मे २०२१ ९८.२४ रुपये
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीनुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरतात. कच्च्या तेलाचे रिफायनरीमध्ये शुद्धीकरण आणि पेट्रोल पंपावर उपलब्ध होईपर्यंत पेट्रोलचे प्रत्यक्ष दर ३३ ते ३६ रुपये लिटर पडतात; पण त्यावर वेगवेगळे कर लागतात. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी असले तरीही पेट्रोल महाग मिळते; कारण तेलाच्या किमतीपेक्षा कर जास्त आहे. यामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा वाटा वेगवेगळा आहे. एक लिटर पेट्रोलचा एक्स रिफायनरी दर ३३.८२ रुपये असेल, तर त्यात ०.३२ रुपये वाहतूक खर्च, उत्पादन शुल्क ३८.५७ रुपये, डीलरचे कमिशन ३.६८ रुपये, मूल्यवर्धित कर (व्हॅट) २५ टक्के, याशिवाय महाराष्ट्रात अतिरिक्त कर म्हणून १०.१२ रुपये आकारले जातात. अशाप्रकारे हे दर ९८.५२ रुपयांच्या घरात जात आहेत.
कोट
पेट्रोलचे दर आता शंभरीच्या घरात गेले आहेत. त्यामुळे वाहन वापरायचे की पुन्हा सायकलवरून फिरायचे, असा प्रश्न पडला आहे. लोकांना अधोगतीकडे नेणारे हे धोरण आहे.
- अभिजित शिंदे, सामान्य ग्राहक
कोट
अन्य देशांमध्ये पेट्रोलचे दर कसे कमी असतात आणि आपल्याकडेच इतके का आहेत, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. अशा महागाईच्या काळात सामान्य माणसाने कसे जगायचे?
- रेहाना शेख, सामान्य ग्राहक
कोट
लॉकडाऊन सुरू असताना काम बंद आहे. शासनाचे सर्व कर, बँकांचे कर्ज यांचा भार घेऊन जगताना आता पेट्रोल दरवाढीने महागाईत आणखी भर टाकली आहे. शासन याचा विचार करते की नाही?
- ऋषिकेश मोने, सामान्य ग्राहक