शिराळा : शिराळा येथे शनिवारी दुपारी डांबरामध्ये अडकलेल्या नागास तीन तासांच्या प्रयत्नाने शिराळकरांनी जीवदान दिले.
येथील नाथ मंदिराजवळील संजय जाधव यांच्या शेतातील शेडजवळ डांबराच्या बॅरेलमध्ये नाग पडला होता. उन्हाने पातळ झालेल्या डांबरामध्ये तो अडकून पडला होता. त्यास काहीही हालचाल करता येत नव्हती. याबाबत माहिती कळताच प्रा. सुशीलकुमार गायकवाड, संतोष गायकवाड, नीलेश गायकवाड, सचिन जाधव, विजय जाधव, रोहन म्हेत्रे, संजय मांगलेकर, ऋतुराज जाधव तेथे पोहोचले.
यावेळी नागाची अवस्था गंभीर होती. याबाबत माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांना दिली. उन्हामुळे गरम झालेल्या डांबरामध्ये नागाला चटके बसत होते. सर्व नागप्रेमींनी डिझेल, खाद्यतेल आणले. जवळजवळ अडीच तास डिझेलने नागाला धुतले, तसेच गोडेतेलाने स्वच्छ करत नागाला डांबरामधून बाहेर काढले. त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी नेण्यात आले. उपचार करून त्यास वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. नाग पूर्ण बरा झाल्यावर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.