लो्कमत न्यूज नेटवर्क
सांगली : अंकलीतील स्मशानभूमी, महिला शौचालयाची सामाजिक कार्यकर्ते राकेश दड्डण्णावर व निर्धार फाऊंडेशनच्या टीमने स्वच्छता, रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहून कायापालट केला. गावातील अंगणवाडी परिसरात वाढलेले गवत काढून स्वच्छताही केली.
निर्धार फाऊंडेशन गेली ३ वर्षे सांगली शहरात अव्याहतपणे स्वच्छतेचे काम करत आहेत. शहरात सुंदर सेल्फी पाँईट साकारले आहेत. इनाम धामणी, अंकली हे गाव शहरालगत असल्यामुळे येथे स्वच्छता करण्याचा निर्धार राकेश दड्डणावर व टीमने घेतला. इनाम धामणीत १५ दिवस स्वच्छता अभियान राबवून गावातील प्रत्येक चौक, रस्ते, गटारांची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर अंकली गावात स्वच्छता अभियानाला सुरूवात करून तिथे नदीकडेला असलेल्या गावच्या स्मशानभूमीची व गावात आल्या आल्या समोरच असलेल्या महिला शौचालयाची दुरवस्था झाली होती. अस्वच्छता, मळकटलेल्या भिंती अशी अवस्था असल्यामुळे सर्वप्रथम स्मशानभूमी व महिला शौचालयाची कार्यकर्त्यांनी स्वच्छता करून रंगरंगोटी करत, त्यावर सामाजिक संदेश, पानेफुले रेखाटली.
त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. गावात पहिल्यांदाच असा उपक्रम होत असल्याने राकेश दड्डणावर व निर्धार फाऊंडेशनच्या टीमचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
राकेश दड्डणावर म्हणाले की, अंकली व आजूबाजूची गावे ही सांगली शहराशी नाते जपून आहेत. त्यामुळे या गावांचे सुशोभिकरण महत्त्वाचे होते. आम्हाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कित्येक नागरिकांनी श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. अनेकांनी आमचे मनोबल वाढविण्याचे काम केले. अंकली गावातील स्मशानभूमी व महिला शौचालयाची स्वच्छता व सुशोभिकरण आम्ही केले. पण केलेले काम टिकवून ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
या उपक्रमात सुरज कोळी, सतीश कट्टीमणी, आकाश डुबल, अमर बनसोडे, लखन सादिगले, प्रथमेश खिलारे, अनिरुद्ध कुंभार, आकाश कट्टीमणी, राहुल पाटील सहभागी झाले होते.