गव्हाण : महाराष्ट्र शासनाच्यावतीने कला क्षेत्रातील मानाचा ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव’ पुरस्कार बस्तवडे (ता. तासगाव)च्या ज्येष्ठ कलावंत हिराबाई शामराव कांबळे-पाचेगावकर यांना जाहीर झाला आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच जाहीर झाला. या मानाच्या पुरस्काराचे पाच लाख रुपये, मानपत्र असे स्वरूप आहे.शामराव पाचेगावकरसह जयवंत सावळजकर यांच्या तमाशात त्यांनी प्रमुख नायिका म्हणून काम केले आहे. पतीच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘पारावरचा तमाशा’ त्यांनी जिवंत ठेवून पारंपरिक तमाशा कला जोपासली आहे. सध्या त्यांची तिसरी पिढी तमाशा क्षेत्रात कार्यरत आहे. पती शामराव पाचेगावकर यांच्या निधनानंतर हिराबाई यांनी मुलांना पारंपरिक कला शिकवली. हिराबाई यांनी राजा हरिश्चंद्र, चंद्रकेतू मुबारक अशा अनेक वगनाट्यांतील प्रमुख भूमिका साकारल्या आणि सर्व वगांच्या टाक्या (म्हणणी) त्या स्वतःच्या पहाडी आवाजात गात होत्या. सध्या त्यांचे वय ९३ वर्षे आहे.
उशिराने पुरस्कार; पण कलाक्षेत्राला प्रोत्साहनवार्धक्यामुळे त्या घरीच असतात. त्यांची पुढची पिढी तमाशाची परंपरा जपत आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य अत्यंत हलाखीत जगत असताना पारंपरिक तमाशा कला जिवंत राहावी, यासाठी या वयातही मुलांना मार्गदर्शन करतात. परंतु आजपर्यंत कोणत्याही पुरस्काराविना वंचित राहिलेल्या हिराबाईंना उतार वयात हा मानाचा पुरस्कार मिळत आहे. उशिरा का होईना; पण हा पुरस्कार म्हणजे तमाशा कलावंतांचा गौरव असून, कला क्षेत्राला प्रोत्साहन देणारा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.