सांगली : रसिकांवर अवीट गोडीच्या स्वरचांदण्यांचा वर्षाव करीत मंगळवारी त्रिपुरारी पोर्णिमेला सांगलीतसंगीत संध्या उजळली. शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या विविध छटा, हृदयाला साद घालणाऱ्या वाद्यांचा बहर, गुरु-शिष्यांची साथसंगत अशा वातावरणात संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानची संगीत सभा पार पडली.सांगलीच्या नेमिनाथनगर येथे ही सभा पार पडली. मनोहरलाल सारडा यांच्या सहकार्याने व गुरुकुल संगीत विद्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संगीत सभेची सुरुवात प. पू. बजरंग झेंडे महाराज, मनोहर सारडा, राधाकिसन डोडिया, वास्तुविशारद प्रकाश जाधव, हरीभाऊ काबरा, ओमप्रकाश झंवर, रतनलाल सारडा यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी विदुषी मंजुषा पाटील-कुलकर्णी, पीएनजीह्णचे समीर गाडगीळ, प्रवीणशेठ लुंकड,शांतिनात कांते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर, उमेश देसाई उपस्थित होते.मैफलीची सुरुवात गुरुकुलची विद्यार्थीनी शर्वरी केळकरच्या राम बिहागने केली. गायकीतील कलात्मकता, रसिकांच्या हृदयाला भिडणारी गोडी याद्वारे शर्वरीने बिहागला सजविले. त्यानंतर याच रागातील लट उलझी सुलझा जा रे बालम ही बंदीशी पेश केली. त्यानंतर तिने गायलेल्या अवघाची संसार सुखाचा करीन या भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.पद्मश्री पंडित उल्हास कशाळीकर यांचे शिष्य पुण्याचे सौरभ नाईक यांनी मैफलीला वेगळ््या उंचीवर नेले. त्यांनी राग मुलतानी आळविताना गोकुल गाव का छोरा, बरसाने की नार हा बडा ख्याल ताणांच्या सुंदर सजावटीने सजवित रसिकांच्या हृदयात घर केले. त्यानंतर संगीत सौभद्र मधील राधाधर मधू मिलिंद जय जय रे हे नाट्यगीत गाऊन मैफलीत आपल्या स्वरांचे रंग उधळले. त्यानंतर बाजे रे मुरलिया बाजे, पायो जी मैने राम रतन धन पायो ही भजने सादर करून भक्तीच्या दरवळाने सर्वांना मोहीत केले.मंजुषा कुलकर्णी यांनी अवघा गर्जे पंढरपूर, अबीर गुलाल उधळीत रंग, श्रीरंगा कमलाकांता ही अभंग श्रृखंला सादर करून भक्तीमय वातावरणात रंग भरला. त्यानंतर त्यांनी माई सॉंवर रे रंग राची ही भैरवी सादर करताना ताणांची नजाकत पेश केली. त्यानंतर संत कान्होपात्रा या नाटकातील जोहार मायबाप जोहार हे नाट्यगीत सादर करून मैफलीची सुंदर सांगता केली. मैफलीत संवादिनी साथ कृष्णा मुखेडकर यांनी, बासरीसाथ सचिन जगताप, प्रथमेश तारळेकर, तबलासाथ सौरभ सनदी यांनी तर टाळसाथ गुरुनाथ कुलकर्णी यांनी दिली.निवेदनातून मैफलीचा सेतूगीतेतील उपदेश, धार्मिक, सांस्कृतिक तत्वांचे विवेचन आणि संगीतातील सुंदरतेचे बारकावे रसिकांसमोर मांडत निवेदक व प्रवचनकार श्रेयस बडवे यांनी मैफलीचा सुंदर सेतू उभारला.